अर मार्शल अमर प्रीत सिंग ( Amar Preet Singh) यांची हवाई दलाच्या (Indian Air Force) प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी (VR Chaudhary) 30 सप्टेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी अमर प्रीत सिंह यांची नियुक्ती झाली. Air Marshal Amar Preet Singh has been appointed as the next Chief of the Air Staff.
गेल्या काही दिवसांपासून नव्या हवाई दल प्रमुख पदासाठी अमर प्रीत सिंग यांचेच नाव पुढे येऊ शकते, अशी चर्चा होती. अखेर त्यांची हवाई दलाच्या प्रमुखपदी निवड झाली. नवीन हवाई प्रमुखांची नियुक्ती करताना सरकारने सेवाज्येष्ठतेनुसार निवड केली. 30 सप्टेंबर रोजी दुपारी ते पुढील एअर चीफ मार्शल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, अमर प्रीत सिंग हे सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
एअर मार्शल अमर प्रीत सिंग यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1964 रोजी झाला. 21 डिसेंबर 1984 रोजी ते डुंडीगल येथील वायुसेना अकादमीमधून भारतीय हवाई दलात गेले. त्यांची फायटर स्ट्रीममध्ये नियुक्त झाली होती. ते गेल्या 38 वर्षांपासून हवाई दलात सेवा करत आहेत. त्यांनी आपल्या सेवेत अनेक मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. गेल्याच वर्षी म्हणजे 1 फेब्रुवारी 2023 रोजी अमर प्रीत सिंग यांनी भारतीय हवाई दलाचे 47 वे उपप्रमुख पद स्वीकारले होते.
Amar Preet Singh शिक्षण कोठून घेतले?
अमर प्रीत सिंग यांनी नॅशनल डिफेन्स अकादमी खडकवासला (National Defense Academy Khadakwasla) आणि एअर फोर्स अकादमी डुंडीगल येथून प्रशिक्षण घेतले आहे. तसेच डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टनचे माजी विद्यार्थी आहेत. नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातून देखील त्यांनी प्रशिक्षणही घेतले आहे.
एअर मार्शल अमर प्रीत सिंग हे फायटर पायलट आहेत. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी भारतीय लढाऊ विमान तेजस उडवून सर्वांनाच आश्चर्यचकित केले होते. जेव्हा त्यांनी तेजस विमान उडवले होते, त्यावेळी त्यांचे वय 59 वर्ष होते. अमर प्रीत सिंग यांनी ऑपरेशनल फायटर स्क्वाड्रन आणि फ्रंटलाइन एअर बेसचे नेतृत्व केले. त्यांनी अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. व्हाईस एअर चीफ असण्यासोबतच ते सेंट्रल एअर कमांडचे ऑफिसर कमांडिंग इन चीफही राहिले आहेत. दरम्यान, हवाई दलातील सेवेबद्दल त्यांना परम विशिष्ट सेवा पदकाने सन्मानीत करण्यात आले होते. तसेच अति विशिष्ट सेवा पदकाने त्यांना प्रदान करण्यात आले आहे.