10 C
New York

Dada Bhuse : मित्रानेही साथ सोडली… मालेगावात भुसे टेन्शनमध्ये

Published:

नाशिक जिल्ह्याला महाराष्ट्राच्या राजकीय कॅन्व्हासवर चमकवण्याचे काम डॉ. भाऊसाहेब हिरे यांनी केले. पारतंत्र्याच्या काळापासून सत्तेची सूत्रे हिरे घराण्याकडे राहिली. पण सहा दशकांनंतर आजच्या दिवसांमध्ये हिरे घराणे अस्तित्वासाठी धडपडत आहे. नाशिकला गेलेल्या हिरे कुटुंबियांची पाऊलं पुन्हा मालेगावकडे वळू लागली आहेत. काँग्रेस, एस काँग्रेस, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, राष्ट्रवादी, भाजप असा प्रवास करत हे कुटुंब आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात स्थिरावले आहे. पण मालेगाववर पुन्हा वर्चस्व मिळविण्यासाठी दादा भुसे यांचे प्राबल्य मोडून काढण्याचे कडवे आव्हान अद्वैय हिरे यांच्यासमोर आहे. यात आता त्यांना यश येणार का? की दादा भुसे पुन्हा हिरे घराण्यावर वरचढ ठरू शकतात? (Malegaon Outer Assembly Constituency, Shiv Sena’s Dada Bhuse will fight against Shiv Sena’s UBT Advai Hirey)

मालेगावमधील स्थानिक स्वराज्य संस्थेपासून डॉ. भाऊसाहेब हिरे यांनी राज्याच्या महसूलमंत्र्यापर्यंत नानाविध पदे भूषवली. नाशिक जिल्हा बँक स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. भाऊसाहेब यांच्यानंतर त्यांचा वारसा पुत्र व्यंकटराव हिरे यांच्याकडे आला. आताचा मालेगाव बाह्य आणि जुना दाभाडी हा हिरे यांचा हक्काचा बालेकिल्ला. व्यंकटराव हिरे 1967 ते 1972 मध्ये राज्यमंत्री राहिले. त्यानंतर त्यांनी चुलतभाऊ डॉ. बळीराम हिरे यांना राजकारणात उतरवले. पण हीच घटना लक्षणीय ठरली. बळीराम हिरे पाहाता पाहाता मंत्री झाले.

बळीराम हिरे यांनी राजकीय मांड पक्की केल्याचे लक्षात येतच व्यंकटराव यांनी पुनरागमनासाठी प्रयत्न सुरू केले. इथूनच हिरे कुटुंबात भाऊबंदकीला सुरुवात झाली. 1980 च्या निवडणुकीत बळीराम हिरे काँग्रेस (आय) कडून तर व्यंकटराव हिरे काँग्रेस (यू) कडून उभे ठाकले. यात व्यंकटराव यांचा पराभव झाला. 1985 च्या निवडणुकीत व्यंकटराव हिरे यांनी शरद पवार यांच्याकडून पत्नी पुष्पाताई यांच्यासाठी एस कॉँग्रेसकडून उमेदवारी मिळवली. तर बळीराम हिरे यांनी पत्नी इंदिराताई यांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. दोन जावांमध्ये झालेल्या लढतीत पुष्पाताई विजयी झाल्या आणि मंत्रीही बनल्या. 1990 मध्येही पुष्पाताईंनी दाभाडी राखली.


1995 च्या निवडणुकीत पुष्पाताई यांना बळीराम हिरे यांनी कडवे आव्हान दिले. यात बळीराम हिरे यांचा अवघ्या 2500 मतांनी पराभव झाला. विजयी पुष्पाताई यांची पुन्हा मंत्रिमंडळात एन्ट्री झाली. 1999 च्या निवडणुकीत पुष्पाताई यांचे पुत्र प्रशांत हिरे यांना आमदारकीची स्वप्ने पडू लागली. त्यामुळे आई विरुद्ध मुलगा असे चित्र निर्माण झाले. अखेर मोठे मन दाखवत पुष्पाताईंनीच माघार घेतली. त्यावेळी बळीराम हिरे यांनी काँग्रेसकडून उमेदवारी घेतली. तर प्रशांत हिरे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली. काकांचा पराभव करत प्रशांत हिरे विजयी झाले आणि मंत्रीही बनले.

एकीकडे हिरे घराणे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात पाय रोवत असतानाच मतदारसंघातील जनतेशी नाळ तुटत गेली. संस्थेच्या कारभाराकडे दुर्लक्ष होत गेल्याने सेवकही विरोधात गेले. हळू हळू दाभाडी मतदारसंघ हिरे यांच्या ताब्यातून निसटला. 2004 च्या निवडणुकीत प्रशांत हिरे राष्ट्रवादीकडून मैदानात उतरले. तर बंधू प्रसाद बळीराम हिरे यांना भाजपने उमेदवारी दिली. दादा भुसे यांनीही अपक्ष उभे राहत राजकारणाचा श्रीगणेशा केला. हिरे घराणे पक्षांतर्गत स्पर्धेत डोईजड ठरत होते. त्यामुळे छगन भुजबळ यांनाहा हिरे यांचा पराभव करायचाच होता. त्यासाठी भुजबळ यांनी पडद्यामागून भुसे यांना मदत केली. त्यावेळी दाभाडीमध्ये पहिल्यांदाच हिरे कुटुंबाचा पराभव झाला

2009 मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना होऊन दाभाडीऐवजी मालेगाव बाह्य मतदारसंघ तयार झाला. त्यावेळी, शिवसेनेकडून दादा भुसे आणि राष्ट्रवादीकडून प्रशांत हिरे असा सामना झाला. तेव्हाही भुसे-भुजबळ जोडीने हिरे यांना राजकारणात डोके वर काढू दिले नाही. प्रशांत हिरे यांची जादू संपली असे चित्र निर्माण झाले. त्याचवेळी अपूर्व हिरे आणि अद्वैय हिरे या दोन्ही मुलांनी जनराज्य आघाडीच्या माध्यमातून अस्तित्वाची लढाई लढण्यास सुरू केली. मालेगाव महापालिका, नाशिक जिल्हा परिषद, मालेगाव पंचायत समिती या माध्यमातून काम सुरु ठेवले. पण त्यातून फारसे काही हाती लागत नव्हते. त्यामुळे प्रशांत आणि अपूर्व यांनी आपला मुक्काम नाशिकला हलविला.

यशोमतीताईंना पाडण्याचा ‘राणांचा’ विडा… वानखडेंना ताकद देणार?

नाशिक महापालिकेत अपूर्व हिरे नगरसेवक झाले. त्यानंतर हिरे कुटुंबाला पुन्हा उभे राहू शकतो हा आत्मविश्वास आळा. विधान परिषद निवडणुकीत हिरे घराण्याने छगन भुजबळ यांच्याविरोधात दंड थोपटले. महात्मा गांधी विद्या मंदिराच्या रूपाने तयार झालेली ताकद वापरुन अपूर्व हिरे भाजपकडून नाशिक शिक्षक मतदारसंघातून आमदार झाले. प्रशांत हिरे यांनी आपली सगळी राजकीय ताकद पणाला लावत अद्वैय हिरे यांना जिल्हा बँकेतील अध्यक्षपदाची खुर्ची मिळवून दिली. 2014 च्या निवडणुकीत हिरे कुटुंबातील चौथी पिढी रिंगणात उतरली. मालेगाव मतदारसंघातील अवघड गणितांचा विचार करुन अद्वैय हिरे भाजपकडून शेजारच्या नांदगाव मतदारसंघातून रिंगणात उतरले. परंतु, त्यांचा पराभव झाला. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले.

इकडे मालेगाव बाह्य मतदारसंघात भुसे यांना तगडा स्पर्धकच नव्हता. भाजप आणि शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवून, मोदी लाट असूनही दादा भुसे तब्बल 37 हजार मतांनी विजयी झाले. मंत्रीही झाले. हिरे कुटुंबीयांनी पुन्हा राष्ट्रवादीची वाट धरली. 2019 च्या निवडणुकीत अपूर्व हिरे यांनी नाशिक पश्चिम मतदारसंघातून नशीब आजमावले. पण तिथेही त्यांचा 10 हजार मतांनी पराभव झाला. इकडे मालेगाव मतदारसंघात शिवसेनेच्या भुसे यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉ. तुषार शेवाळे रिंगणात होते. या निवडणुकीत एक लाख 21 हजार मते घेत भुसे यांचा 48 हजार मतांनी विजय झाला. राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले आणि ते कॅबिनेट मंत्रीही बनले.

याच समीकरणांनी हिरे पुन्हा अस्वस्थ झाले. मालेगाव बाह्यची जागा भविष्यात शिवसेनेच्या वाट्याला येईल अशी शक्यता गृहीत धरत अद्वय हिरे भाजपमध्ये गेले. पण महायुती सत्तेत आली आणि परिस्थिती पुन्हा बदलली. हिरे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. ठाकरे यांनाही भुसे यांच्याविरोधात प्रबळ उमेदवारीची गरज असल्याने हा पक्षप्रवेश हिरे आणि ठाकरे या दोघांसाठीही जमेची बाजू होती. या दरम्यानच्या काळात नाशिक जिल्हा बँकेतील कर्ज घोटाळ्या प्रकरणी हिरे यांना अटक झाली.

त्याचवेळी दादा भुसे यांचे एकेकाळचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे बंडू बच्छाव अॅक्टिव्ह झाले. त्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. भुसेंप्रमाणेच बच्छाव यांना मानणारा मोठा वर्ग मतदारसंघात आहे. बच्छाव आणि भुसे या जोडीवर मतदारसंघ भरभरुन प्रेम करतो. बारा बलुतेदार मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करत बच्छाव मतदारसंघात पोहचले आहेत. याचाच फायदा घेत ते ठाकरे गटात सक्रिय झाले. दुसऱ्या बाजूला नऊ महिने कारागृहात राहिल्यानंतर 12 ऑगस्ट रोजी अद्वैय हिरे यांना जामीन मंजूर झाला.

दादा भुसे यांच्याविरोधात लढण्यासाठी आता एकाच पक्षात दोन स्पर्धक तयार झाले होते. ही भुसे यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट होती. विरोधक विखुरला गेला होता. तिरंगी लढतीत याचा फायदा होईल अशी भुसे यांनी अटकळ बांधली. पण त्याचवेळी हिरे किंवा आपण कोणालाही उमेदवारी मिळाल्यास संपूर्ण शक्तिनीशी लढू असे म्हणत बच्छाव यांनी गुगली टाकली. ही गुगली भुसे यांची डोकेदुखी वाढविणारी आहे. पण लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात येणाऱ्या या विधानसभा मतदारसंघात दादा भुसे यांनी भाजपला 55 हजाराचे मताधिक्य मिळवून दिले आहे. भुसे यांच्या दृष्टीने ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भुसे पुन्हा हिरे यांना वरचढ ठरणार की मित्र मित्राला मात देणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img