17.6 C
New York

Nana Patole : हे सरकार कमिशनखोर, शिवपुतळा केवळ दिखाव्यासाठी उभा केला; नाना पटोले यांचे सरकारवर गंभीर आरोप

Published:

मुंबई

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Shivaji Maharaj Statue) उभारताना कोणत्याही वैज्ञानिक पद्धतीचा अलंब करण्यात आलेला नाही. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घाईघाईत पुतळ्याचं उद्घाटन करण्यात आलं. या उद्घाटनाला खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह उपस्थित होते. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दिखाव्यासाठी हे सर्व करण्यात आलं होतं, त्यामुळे हे शिवप्रेमी नसून शिवद्रोही असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला.

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा कोसळण्याची घटना महायुतीच्या भ्रष्ट कारभाराचा नमुना आहे. पुतळा कोसळून महाराजांचा घोर अपमान करणाऱ्या युती सरकार विरोधात महाविकास आघाडी रविवारी १ सप्टेंबर रोजी मुंबईत ‘जोडे मारो’ आंदोलन करणार आहे. सकाळी हुतात्मा चौकापासून गेट वे ऑफ इंडियापर्यंत मोर्चा काढून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन केले जाणार आहे. तर २ सप्टेंबरपासून संपूर्ण राज्यात जिल्हा व तालुक्यातही हे आंदोलन करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मातोश्रीवर बैठक झाली व या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करण्याची हिम्मत या भाजपा युतीच्या नेत्यांची होतेच कशी? भ्रष्टाचाराचा कलंक लागलेल्या एका खासदाराने महाराजांचा जिरे टोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डोक्यावर चढवून महाराजांचा अपमान केला. आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात यापेक्षा मोठा पुतळा बसवू, या कमीशनखोर सरकारला अक्कल कधी येणार? छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात आज महिला, शाळेतील मुलीही सुरक्षित नाहीत, जनतेत सरकार विरोधात प्रचंड आक्रोश आहे. घाबरलेले सरकार जनतेचा उठाव होऊ नये यासाठी प्रयत्न करत आहे, असे नाना पटोले म्हणाले.

राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही. रश्मी शुक्ला यांना कोणत्या आधारावर पोलीस महासंचालक पदाचा कार्यकाळ वाढवून दिला आहे. या पोलीस महासंचालक भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वसंयेवक संघाचा अजेंडा चालवत आहेत. राज्य सरकारची चुकीची धोरणे व पोलीस प्रशासनाच्या कारभारामुळेच राज्यातील परिस्थिती बिघडली आहे, असेही नाना पटोले म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून अपमान करण्यात आला. या घटनेवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने बनवलेला व्हिडीओ यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी माध्यमांना दाखवला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img