24.6 C
New York

Shravan Somvar : श्री कपर्दिकेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

Published:

रमेश तांबे, ओतूर

ओतूर येथील ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वर चौथा श्रावणी सोमवार (Shravan Somvar) यात्रे निमित्त सोमवारी दि. २६ रोजी पहाटे सहा वाजल्यापासून रात्री पावणे बारा वाजेपर्यंत लाखो भाविकांनी श्री कपर्दिकेश्वर मंदिरात (Kapardikeshwar Mandir) शिवलींगावर साकारण्यात आलेल्या कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडीचे व जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांचे गुरू श्री बाबाजी चैतन्य महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेतले. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलींगावर तयार होणाऱ्या कोरड्या तांदळाच्या कलात्मक पिंडीचे दर्शन घेण्यासाठी जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे येत असतात. श्रावणी सोमवारी पहाटेपासूनच मंदिरासमोर महिला व पुरूषांनी दर्शनासाठी स्वतंत्र रांगा लावल्या होत्या.

चौथ्या श्रावणी सोमवार यात्रेनिमित्त श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तांदळाच्या चार कलात्मक पिंडी तयार करण्यात आल्या होत्या.पहाटे सहा वाजता मनीष पानसरे, बबनराव गाढवे, अनंतराव चौगुले,मनोहर डोके, शंकरराव शेरकर यांच्या हस्ते सपत्नीक महाअभिषेक,आरती करून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.

यावेळी श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्थेचे अध्यक्ष अनिल तांबे, महेंद्र पानसरे, सचिन तांबे, जितेंद्र डुंबरे, नितीन तांबे, सागर दाते, टी.के. डुंबरे, दिनेश कर्डिले, अमोल डुंबरे, तन्मय इसकांडे, विश्वास डुंबरे,  पुजारी गोविंदराव डुंबरे, सागर घोडेकर, दत्ता शिंदे आदी मान्यवर उपस्थीत होते. श्री कपर्दिकेश्वर स्विमिंग अँड वॉकिंग ग्रुपच्या वतीने भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले.तसेच शिवभक्त समर्थ कुलकर्णी यांच्या वतीने केळी वाटप करण्यात आले,निलेश घोलप मित्र परिवाराच्या वतीने चिक्की वाटप करण्यात आले.दुपारी तीन वाजता मंदिराजवळील कुस्ती स्टेडियममध्ये कुस्त्यांचा आखाडा भरला होता.

कुस्त्या खेळण्यासाठी पुणे, अहमदनगर, कल्याण, ठाणे, नशिक, शिर्डी, करमाळा, नेवासा, राहुरी आदी ठिकाणाहून मल्ल आले होते. कुस्त्या जमविण्याचे काम उल्हास गाढवे,अविनाश ताजणे, विकास डुंबरे, प्रकाश डुंबरे, यांनी केले तर कुस्त्या सोडविण्याचे काम धनंजय डुंबरे, छबुराव थोरात, जालिंदर ढमाले, विकास डुंबरे यांनी केले. बबन डुंबरे,गांधी पानसरे,ज्ञानेश्वर खामकर,भाऊसाहेब खाडे यांनी समालोचन केले. आखाड्यास जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके,माजी आमदार शरद सोनवणे,माजी आमदार बाळासाहेब दांगट,विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर,माजी जि.प.सदस्य अंकुश आमले,मोहित ढमाले,गजानन महाराज शिक्षण मंडळाचे अध्यक्ष,माजी नगरसेवक विशाल तांबे,ओतूरचे उपसरपंच प्रशांत डुंबरे,शरद चौधरी,विघ्नहरे संचालक विवेक काकडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली.

श्री कपर्दिकेश्वर देव-धर्म संस्था व समस्त ग्रामस्थ ओतूर यांच्या वतीने देण्यात येणारा ओतूर भूषण पुरस्कार पांडुरंग नानाभाऊ डुंबरे यांना जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके,माजी आमदार शरद सोनवणे,माजी आमदार बाळासाहेब दांगट आदी उपस्थीत मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.

ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीहरी सारोक्ते यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक यात्रेतील भाविकांना आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत होते. नारायणगाव एसटी आगाराच्या वतीने यात्रेकरूंसाठी जादा एसटी गाड्यांची सोय करण्यात आली होती.यात्रेतील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जुन्नरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एल.जी.थाटे यांनी पोलीस नागरिक मित्र, तसेच पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img