26.5 C
New York

Nana Patole : महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे पाप जनता विसरलेली नाही – नाना पटोले

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला (MahaYuti) धक्का दिला आहे. स्वयंघोषित विश्वगुरु यांनीही राज्यात 17 जाहीर सभा घेतल्या परंतु जनतेने त्यांना जागा दाखवली आहे. जनता विसरून जाते असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणत आहेत पण महाराष्ट्र गुजरातला विकण्याचे महायुती सरकारचे पाप महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता विसरलेली नाही. जनतेच्या विश्वास घाताची किंमत महायुतीला विधानसभा निवडणुकीतही घरी बसून जनताच दाखवून देईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे.

गांधीभवन येथे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे उपस्थित होते.
बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीत कोणीही मोठा भाऊ, छोटा, भाऊ नाही, जागा वाटपाचा निर्णय मेरिटनुसारच होणार आहे. महाविकास आघाडी म्हणूनच या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही अशीच भूमिका मांडलेली आहे. आजच्या बैठकीत जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाली तसेच राज्यातील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. जाहिरनामा समितीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे समाजातील विविध घटकांशी चर्चा करुन राज्यातील जनतेला अपेक्षित असणारा जाहिरनामा बनवला जाणार आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली भेटीवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, उद्धव ठाकरे हे काही पहिल्यांदाच दिल्लीला गेलेले नाहीत, ते याआधीही गेले होते. दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनासह सोनियाजी गांधी यांनाही ते भेटत आहेत, या भेटीतून वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही. सोनियाजी गांधी देशातील महत्वाच्या व्यक्ती आहेत, पंतप्रधानपद नाकारणाऱ्या त्यागमूर्ती आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली दोनदा काँग्रेस प्रणित युपीए सरकार देशात सत्तेत होते, त्यांना जर उद्धव ठाकरे भेटत असतील तर त्यात गैर काय? जागा वाटपाची जेंव्हा अंतिम बैठक असेल त्यावेळी उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याशी चर्चा होईल, असे नाना पटोले म्हणाले.

कायदा सुव्यवस्थेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, भाजपा सरकार गुंडगिरी, ड्रग्ज माफियांना अभय देणारे सरकार आहे. सत्ताधारी पक्षाचा एक आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो तर दुसरा गणेशोत्सवात गोळीबार करतो, व्यापाऱ्याला धमकावले जात आहे. १५ हजार मुली व महिला बेपत्ता आहेत, महिलाही सुरक्षित नाहीत. कायदा व पोलिसांना कोणी जुमानत नाही असे चित्र आहे. तळोजा जेलमध्ये कैद्यांना फाईव्हस्टार सुविधा दिल्या जात आहेत म्हणजे गुंडांना पाठिंबा देणारे महायुती सरकार आहे हे स्पष्ट दिसत आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img