19.4 C
New York

Congress : महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य, काँग्रेसकडून आंदोलन

Published:

कोल्हापूर

टोलमाफी वरून काँग्रेसने (Congress) पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. राष्ट्रीय महामार्गावरील पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा रस्ता जोपर्यंत सुस्थितीत होत नाही तोपर्यंत 25% टोल सवलत देण्यात येणार आहे. याशिवाय 20 किलोमीटर परिसरातील गावातील वाहनधारकांना टोल माफी असणार आहे. तर 50 टक्के टोल सवलत देण्याबाबतचा प्रस्ताव येत्या एक महिन्याच्या आत केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. याबाबत लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसने आंदोलन स्थगित केले आहे. या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास, पुन्हा आंदोलन छेडण्याचा इशाराही विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज बंटी पाटील यांनी दिला आहे.

कोल्हापूर ते पुणे महामार्गावर प्रचंड खड्डे पडले असून रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. त्यामुळे जोपर्यंत रस्त्याचे काम होत नाही तोपर्यंत टोल माफी करण्यात यावी, ही मागणी घेऊन काँग्रेस पक्षाच्यावतीने आज टोल नाक्याच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. कोल्हापूरहून पुणे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील किणी, तासवडे, आनेवाडी आणि खेड शिवापुर या चारही टोल नाक्याच्या ठिकाणी काँग्रेसने एकाचवेळी आंदोलन केले. कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 9 वाजता आंदोलनाला सुरूवात झाली. सुमारे पाच तास चाललेल्या या आंदोलनाला अखेर यश आले. काँग्रेसच्या या आंदोलनाची दखल घेत, रस्त्यांची जोपर्यंत दुरुस्ती होत नाही तोपर्यंत टोल मध्ये 25% टोल सवलत देणार तसेच टोल नाक्यापासून 20 किलोमीटर गावातील नागरिकाना टोल माफी असणार आहे. 50 टक्के टोल माफीचा प्रस्ताव येत्या एक महिन्या मध्ये केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. सर्विस रोडवरील खड्डे पंधरा दिवसात बजविण्यात येणार आहेत. याबाबत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर काँग्रेसचे हे आंदोलन स्थगित करण्यात आले.पुणे ते कोल्हापूर या राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने जोपर्यंत रस्ते सुस्थितीत होत नाही तोपर्यंत टोलची आकारणी करू नये अशी मागणी काँग्रेसने केली होती.

या आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजूबाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बाळासाहेब खाडे, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, भोगावती कारखान्याचे चेअरमन शिवाजी पाटील, बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील-भुयेकर, काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी उपमहापौर सुलोचना नाइकवडे, विक्रम जरग, संजय मोहिते, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, भारती पोवार, प्रविण केसरकर, तौफिक मुल्लाणी, दुर्वास कदम, सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, संध्या घोटणे, शशिकांत खवरे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आनेवाडी तासवडे या सातारा जिल्ह्यातील दोन टोल नाक्यावरही आंदोलन करण्यात आले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तासवडे तर आणेवाडी टोल नाक्यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी आंदोलन केले. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तासवडे टोलनाका येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, खड्डेयुक्त महामार्ग असताना केंद्र सरकारने दोन दोन ठेकेदारांना ठेका दिलेला आहे. हा जनतेचा पैसा आहे. मोदी गडकरींच्या खिशातील पैसा आहे का? असा संतप्त सवाल केला. अदानी आणि रिलायन्सला महामार्गाच्या कामाचा काय अनुभव आहे म्हणून त्यांना ठेका दिला आहे. गेल्या वर्षांपासून प्रवाशांची परवड सुरू असून महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. १५-२० टक्के कमिशन घेण्यासाठी चुकीच्या मार्गाने ठेका देण्याची प्रथा मोदींनी सुरू केली आहे. महामार्गाचे उप ठेका डी.पी. जैन यांना दिला असून गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे हजार कामगारांचे पगार झालेले नाहीत. यामुळेच कामाला गती मिळत नसून याचा नाहक त्रास जनतेला भोगावा लागत आहे. यावेळी आमदार विश्वजित कदम, उदयसिंह पाटील-उंडाळकर, शिवराज मोरे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर टोलनाक्यावर आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुणे सातारा महामार्गाची दुरवस्था झाल्याने संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. पावसामुळे महामार्गावर खड्डे पडले आहेत तरिही टोल वसुली केली जात आहे. ८ दिवसाच्या आता खड्डे बुजवण्याची मागणी यावेळी करण्यात महामार्ग प्राधिकरणाने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. यावेळी देविदास भन्साळी, श्रीरंग चव्हाण, संग्राम मोहोळ, यांच्यासह पुणे जिल्हा काँग्रेस व भोर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img