कालाविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली असून, ज्येष्ठ मराठी अभिनेते आणि नाटकार बाळ कर्वे (Bal Karve Passed Away)यांचे मुंबईत निधन झाले आहे. ते 95 वर्षांचे होते. बाळ कर्वे यांची कन्या स्वाती यांनी याबाबत माहिती दिली आहे. कर्वे यांनी दूरदर्शनवरील चिमणराव-गुंड्याभाऊ मालिकेत केलेली गुंड्याभाऊची भूमिका खूप प्रसिद्ध झाली होती. ही मालिका १९७९ साली आली होती. कर्वे यांचा 95 वा वाढदिवस तीन दिवसांपूर्वी साजरा करण्यात आला होता. बन्या बापू चित्रपटात बाळ कर्वे यांनी साकारलेली बापूची भूमिकादेखील विशेष गाजली होती. कर्वे यांना ‘आई रिटायर होते’ या नाटकातील भूमिकेसाठी राज्य शासनाचा ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ हा पुरस्कार मिळाला होता. तसेच गुंड्याभाऊच्या भूमिकेसाठी महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते.
Bal Karve Passed Away बाळ कर्वे यांचा जीवनप्रवास
बाळ कर्वे यांचा जन्म २५ ऑगस्ट, १९३० रोजी झाला. कर्वे कुटंबीय पुण्याचे. त्यांचे शालेय, महाविद्यालयीन आणि पुढील अभियांत्रिकी पदवी शिक्षण पुण्यातच झाले. बाळ कर्वे यांचे खरे नाव ‘बाळकृष्ण’. पण पूर्ण नाव घेण्याऐवजी नुसतेच ‘बाळ’ म्हणू लागले आणि पुढे हेच नाव रूढ झाले. ‘कॉलेज ऑफ इंजिनीअिरग पुणे’ येथून ते ‘स्थापत्य अभियंता’ झाले. त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेत स्थापत्य अभियंता म्हणून नोकरीला लागले. त्यांनी बत्तीस वर्षे नोकरी केली. नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईत पार्ल्यात एका नातेवाइकाकडे राहात.. त्याच इमारतीत सुमंत वरणगांवकर राहायचे. ते रंगभूमीशी संबंधित होते. त्यांची मैत्री नाटकाची आवड असल्यामुळे झाली आणि दोघांनी मिळून ‘किलबिल बालरंगमंच’ अशी छोटीशी संस्था स्थापन केलीआणि त्तिच्यासाठी ते बालनाट्ये बसवू लागले.
Bal Karve Passed Away गुंड्याभाऊ हे बाळ कर्वेंनी साकारलेलं पात्र विशेष गाजलं
‘चिमणराव-गुंड्याभाऊ’ ही भारतातील पहिली टीव्ही मालिका होती. तोपर्यंत टीव्हीवर मालिकांचा सिलसिला सुरू झालेला नव्हता. याकूब सईद आणि विजया जोगळेकर यांची ती संकल्पना होती. गुंड्याभाऊच्या भूमिकेसाठी शरद तळवलकरांचे नाव सुचविले होते, पण ते तेव्हा चित्रपटांमध्ये व्यस्त असल्याने त्यांनी कर्व्यांचे नाव सुचविले आणि अपघातानेच वाट्याला आलेल्या त्या भूमिकेने बाळ कर्वे महाराष्ट्रातल्या घराघरांत आणि मनामनांत पोहोचले.