मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी मुंबईमध्ये येत उपोषणाचा इशारा दिलेला आहे. त्या अगोदर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी गणेशोत्सवामध्ये अडथळा आणण्याच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. हिंदू धर्माच्या नावाखाली मराठ्यांची अडवणूक का केली जात आहे, यासाठीच तुम्ही राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवले आहे का? असा सवालही मनोज जरांगे यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांना केला. बुधवारी अंतरवाली सराटी येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जरांगे पाटील बोलत होते.
Manoj Jarange काय म्हणाले मनोज जरांगे?
देवेंद्र फडणवीसांवरती टीका करताना मराठा आंदोलक मनोज जरांगे म्हणाले की, “हिंदू देव-देवतांना पुढे करुन मराठा समाजाला विनाकारण त्रास दिला जात आहे. आम्ही हिंदू असूनही आमच्या सणांच्या नावाखाली आम्हाला रोखले जात आहे. आज ज्यांना हिंदुत्त्वाशी देणंघेणं नाही, धर्माशी देणंघेणं नाही, ज्यांना फक्त राजकारणासाठी हिंदुत्त्व लागतं, ते खोटे हिंदू लोक हिंदू धर्म चालवणाऱ्यांनाही अडवत आहेत. हिंदू धर्माखाली मराठ्यांची अडवणूक का केली जात आहे, याचे उत्तर अमित शाह आणि पंतप्रधान मोदी यांनी द्यावे. यासाठीच तुम्ही राज्यात देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदी बसवले आहे का”, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Manoj Jarange आम्हाला अडवण्याचा अट्टाहास का?
पुढे मनोज जरांगे म्हणाले की, “मराठा आंदोलक शांततेत मुंबईला येत असताना हिंदू असूनही त्यांना त्रास दिला जात आहे. राज्य सरकारलाच सणाच्या दिवशी अशांतता पसरवली जात आहे. आम्ही काय धिंगाणा घालायला किंवा जमिनी घ्यायला मुंबईत येत आहोत का? मग आम्हाला अडवण्याचा अट्टाहास का? राज्य सरकार हिंदूविरोधी वागत आहे. आम्हालाही कळतं की, हिंदू सणात अडथळे नको. गणेशोत्सवाला गालबोट लागेल, असं पाऊल आम्ही मेलो तरी उचलणार नाही.
Manoj Jarange सरकारने दहशतवाद्यांसारखे डाव खेळू नयेत: मनोज जरांगे पाटील
मुंबई उच्च न्यायालयाने आपल्याला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी थेट नाकारलेली नाही. आपण आता न्यायालयात परवानगीसाठी अर्ज करतोय. न्यायालयाने अचानक नवा कायदा काढला. आपण गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील मराठा मोर्चाची माहिती दिली होती. आपण आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आपल्याला कुठेही अडवणे शक्य नव्हते. त्यामुळे 2025 सालचा एक कायदा पुढे करुन आपल्याला परवानगी नाकारण्यात आली. आपल्याला नोटीस देण्यात आली नाही, नवीन कायदा आपल्याला माहितीच नव्हता. काल दुपारी 3 वाजता निकाल आला आणि आज आपल्याला निघायचे आहे. देवेंद्र फडणवीसांच्या लोकांनी याचिका केली, त्यांचाच महाअधिवक्ता उभा राहिला आणि त्यांनी पाहिजे तसा निकाल लावून घेतला. सरकारने दहशतवाद्यांसारखे डाव खेळू नयेत. ही लोकशाही नाही. इंदिरा गांधींच्या काळातही लोकांना अडवलं नाही, ते आता फडणवीसांच्या काळात अडवले जात आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.