जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) परिस्थिती सततच्या मुसळधार पावसामुळे आणखी बिकट झाली आहे. कटरा येथील वैष्णोदेवी (Vaishno Devi) यात्रा मार्गावरबुधवारी (२७ ऑगस्ट) दरड कोसळली असून ३१ जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय. तर २३ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. भूस्खलन आणि मोठाले दगड कोसळ्यामुळं जम्मू-कटरा महामार्ग बंद झाला आहे. यासोबतच इतरही काही छोटे रस्ते बंद झालेत.
मुसळधार पावसामुळे, नॉर्दन रेल्वेने बुधवारी त्यांच्या २२ ट्रेन रद्द केल्या आहेत. तर २७ ट्रेन अर्ध्यातच थांबवल्या आहे. यामध्ये वैष्णो देवी बेस कॅम्पवरून धावणाऱ्या नऊ ट्रेनचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरमधील त्रिकुट येथील एका डोंगरावरील मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर देखील मोठी दुर्घटना घडली. या मार्गावर दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच श्री माता वैष्णो देवी मंदिर समिती, स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. दगड आणि मातीच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले गेले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक लहान-मोठ्या नद्यांना आणि ओढ्यांना पूर आलाय. यासोबतच अनेक भागातून दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. जम्मूमध्ये एका नदीवरील पूल वाहून गेलाय. अनेक ठिकाणी विजेचे खांब पडले आहेत. तर काही ठिकाणी शॉर्ट सर्किट सारख्या दुर्घटना झाल्या आहेत. मंगळवारी सकाळी ११.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत अवघ्या सहा तासांत २२ सेमी पावसाची नोंद झाली आहे. रात्री पाऊस थोडा कमी झाल्याने काही भागात पाण्याची पातळी कमी झाली आहे. मात्र, पाऊस अद्याप थांबलेला नाही.
Vaishno Devi ३,५०० लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर
मुसळधार पाऊस आणि पुरामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. परिणामी, बचाव पथके आणि प्रशासनाने धोकादायक स्थितीत असलेल्या गावांमधील लोकांना सुरक्षित स्थळी हवलवं आहे. काल (२६ ऑगस्ट) ३,५०० हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जिल्हा प्रशासन, जम्मू आणि काश्मीर पोलिस, एनडीआरएफ, एसडीआरएफ, भारतीय सैन्य आणि स्थानिक स्वयंसेवकांकडून विविध ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे.दरम्यान, सरकारने हेल्पलाइन क्रमांक जारी केले असून, मृत आणि जखमींच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
Vaishno Devi भूस्खलनाचा धोका वाढला
हवामान खात्याने (IMD) जम्मू परिसरात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे भूस्खलनाचा धोका वाढला आहे. भाविकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आणि प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे.