बॉलिवूडचा सुपरस्टार गोविंदा (Govinda) आणि पत्नी सुनिता अहुजा (Sunita) यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. 38 वर्षांच्या वैवाहिक आयुष्याला सुनिता यांनी घटस्फोटाची मागणी केली असून, त्यांनी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केल्याची बातमी पसरली. यामध्ये त्यांनी गोविंदावर एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आणि अत्याचारासह अनेक गंभीर आरोप केले असल्याचंही म्हटलं जात आहे.
मात्र या चर्चांवर गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा (Shashi Sinha) यांनी प्रतिक्रिया देत सर्व दावे फेटाळले. त्यांनी स्पष्ट केलं की, “हे सर्व मुद्दे जुने आहेत, त्याला पुन्हा रंग दिला जात आहे. गोविंदा कधीच कोणावर हात उचलणारे किंवा ओरडणारे नाहीत. सुनिता आणि गोविंदा यांच्यात मतभेद असतील, पण घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलेलं नाही.”
शशी सिन्हा यांनी पुढे सांगितलं की, गोविंदा आणि सुनिता दोघंही न्यायालयात गेलेले नाहीत आणि ते अजूनही एकत्र आहेत. “प्रत्येक नात्यात चढ-उतार असतात. पण या अफवांमुळे त्यांच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतोय. गणेशोत्सवाच्या दिवशी तुम्ही त्यांना एकत्र पाहाल,” असं त्यांनी नमूद केलं.
फेब्रुवारी 2025 पासून या दाम्पत्याच्या विभक्त होण्याच्या चर्चा सुरू आहेत. काही काळापासून दोघं वेगळं राहत असल्याचं म्हटलं जात असलं, तरी मॅनेजरच्या म्हणण्यानुसार घटस्फोटाचा प्रश्नच नाही.