विधानसभा निवडणुकीची धामधूम (Bihar Elections 2025) बिहारमध्ये सुरू आहे. यातच राज्यात स्पेशल इंटेंसिव रिवीजन (SIR) सुरू आहे. याच दरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. दोन पाकिस्तानी महिलांची नावे भागलपूर जिल्ह्यात मतदार ओळखपत्र जारी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार केंद्रीय गृहमंत्रालयाच्या तपासात समोर आला आहे.
गृह मंत्रालयाच्या टीमने व्हीजाची मुदत संपल्यानंतरही भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. याच दरम्यान भागलपूरमध्ये तीन पाकिस्तानी नागरिक राहत असल्याची माहिती मिळाली. यातील दोन महिला होत्या. गृह मंत्रालयाचा रिपोर्ट समोर आल्यानंतर पोलीस मुख्यालयाने एसएसपीकडे या प्रकरणाचा तपास सोपवला. यानंतर सखोल तपास केल्यानंतर या पाकिस्तानी महिलांचे मतदान ओळखपत्र देखील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.
या प्रकाराने प्रशासनात मोठी खळबळ उडाली. स्पेशल ब्रँचच्या पोलीस अधीक्षकांनी भागलपुरचे जिल्हाधिकारी डॉ. नवलकिशोर चौधरी आणि एसएसपी यांना तपास अहवाल मागवला आहे. आता या दोन्ही पाकिस्तानी महिलांचे नाव मतदार यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.