मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी (Nita Ambani) यांनी मोठा निर्णय घेतला असून इंग्लंडमधील ओव्हल इन्व्हिन्सिबल्स (Oval Invincibles) या संघाचे नाव पुढील वर्षी बदलले जाणार आहे. 2026 च्या हंगामापासून हा संघ एमआय लंडन या नवीन नावाने मैदानात उतरेल.
मुकेश अंबानी यांच्या रिलायन्सने (Realiance) या संघातील 49 टक्के हिस्सा विकत घेतल्यानंतर हा बदल निश्चित झाला आहे. अंबानी कुटुंब ‘एमआय’ या ब्रँडला जागतिक स्तरावर विस्तारत असून याआधी एमआय केपटाऊन, एमआय न्यू यॉर्क, एमआय एमिरेट्स आणि डब्ल्यूपीएलमधील मुंबई इंडियन्स अशा अनेक टीम्स त्यांनी स्थापन केल्या आहेत. आता ‘एमआय लंडन’ त्यात नवा भर घालणार आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) काउंटी नावांच्या वापरावर बंदी घातल्यामुळे नाव बदलण्यास कोणतीही अडचण नसल्याचे समजते. दरम्यान, सरे संघाला या निर्णयाशी पूर्ण सहमती नसली तरी अंबानी कुटुंब ‘एमआय लंडन’ (MI London) हेच नाव ठेवण्यावर ठाम आहे.
सध्या ओव्हल इन्व्हिन्सिबल्सने द हंड्रेड लीगमध्ये जबरदस्त कामगिरी करत 6 पैकी 5 सामने जिंकले असून पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. जॉर्डन कॉक्स, सॅम करन यांसारख्या खेळाडूंनी दमदार फलंदाजी करत संघाला सातत्याने विजय मिळवून दिला आहे.