गेल्या दोन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झालं. रस्ते पाण्याखाली गेले, प्रवास अडचणीचा झाला आणि नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पण कल्पना करा, जगात अशीही ठिकाणं आहेत जिथे फक्त दोन दिवस नव्हे तर संपूर्ण वर्षभर पाऊस पडतो!
भारतातील पावसाची राजधानी
मेघालयमधील मावसिनराम आणि चेरापुंजी ही दोन गावे जगप्रसिद्ध आहेत. दरवर्षी तब्बल 11,872 मिमी पाऊस येथे नोंदवला जातो. खासी टेकड्यांवर आदळणारे मान्सून वारे वर्षभर ढगांचा खेळ मांडतात. त्यामुळे छत्री घेऊन बाहेर पडणं हेथील लोकांसाठी दैनंदिन सवय झाली आहे. सूर्यदर्शन इथे विरळाच!
हवाईतील हिलो शहर
अमेरिकेतील हवाई प्रांतातील हिलो शहर हे सततच्या पावसासाठी ओळखलं जातं. ज्वालामुखी पर्वतांची रांग आणि वादळी वारे यामुळे वर्षभर इथे ओलसर वातावरण टिकून राहतं.
कॅमेरूनचं पावसाळी गाव
माउंट कॅमेरूनच्या पायथ्याशी वसलेलं एक गाव जवळपास दररोज पावसाने न्हाऊन निघतं. अटलांटिक महासागरातून येणाऱ्या ओलसर वाऱ्यांमुळे येथील वातावरण कायम पावसाळी असतं.
कोलंबियाचं टुटुनेन्डो
दक्षिण अमेरिकेतील टुटुनेन्डो (कोलंबिया) हे जगातील सर्वाधिक पावसाळी भागांपैकी एक. इथले लोक छत्रीशिवाय घराबाहेर पडण्याची कल्पनाही करू शकत नाहीत. पावसाच्या सरींसोबतच त्यांचं दैनंदिन जीवन पुढे सरकतं. मुंबईत दोन दिवसांचा पाऊस लोकांना हैराण करून टाकतो, पण या ठिकाणी वर्षभर ढगांचा मुक्काम असतो. पाऊस हेथील लोकांसाठी त्रास नसून त्यांच्या जीवनशैलीचाच एक भाग आहे.