येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पण त्यातही सर्व राजकीय पक्ष्यांचे विशेष लक्ष असणार आहे ते मुंबई महानगरपालिकेकडे. त्यामुळे त्यादृष्टीने सर्व राजकीय नेतेमंडळी कामाला लागली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सुद्धा मुंबई महानगरपालिकेवर विजय मिळवण्यासाठी निवडणुकीचा मास्टर प्लॅन तयार केला आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या नेतृत्वात अजित पवारांची राष्ट्रवादी मुंबई महापालिका निवडणूक लढणार आहे. समीर भुजबळ यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या मुंबई अध्यक्षपदासाठी पक्षाने थेट अध्यक्ष नेमण्याऐवजी निवडणूक व्यवस्थापन समितीची स्थापना केली असून, नवाब मलिक यांच्याकडे या समितीची धुरा सोपवली आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष नवाब मलिक आहेत. तर, शिवाजीराव नलावडे, सिद्धार्थ कांबळे, आमदार सना मलिक, झिशान सिद्दीकी, संतोष धुवाळी, भास्कर विचारे, संजय तटकरे, राजू घुगे, महेंद्र पानसरे, अजय विचारे, अर्शद अमीर, इंद्रपाल सिंग, सुरेश भालेराव यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे. या समितीचे अध्यक्ष झाल्यानंतर मलिक यांच्या नेतृत्वातील बैठक बुधवारी (ता. 20 ऑगस्ट) घेण्यात आली. या बैठकीत संघटना बांधणी आणि महापालिकेच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, मलिकांनी आता राष्ट्रवादीच्या सर्व सेलला अॅक्टिव्ह करून तळगळात पोहचण्याचा अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.
नवाब मलिकांनी विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सेवादल, महिला, विद्यार्थी, ओबीसी, सामाजिक न्याय, सहकार, असंघटित कामगार, हिंदी भाषिक, अल्पसंख्याक, झोपडपट्टी सेलच्या प्रमुखांशी बैठक घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला कोणत्याही परिस्थितीत जिंकून आणण्यासाठी नवाब मलिक यांनी मोर्चेबांधणीचा नारळ फोडला आहे. यावेळी त्यांमनी सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निवडणुकीसाठी काय काय करण्याची गरज आहे, याबाबतची सविस्तर चर्ता केली. तसेच, संघटन आणखी मजबूत करण्यासाठीचा प्लॅन सुद्धा या बैठकीत तयार करण्यात आला आहे. परंतु, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीमधील घटक पक्ष एकत्र लढणार की वेगवेगळे लढणार, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.