भारतीय स्वयंपाकघरात मसाल्यांसोबत वापरल्या जाणाऱ्या बियांमध्ये मेथी हा एक अतिशय गुणकारी घटक आहे. याचा उपयोग फक्त चवीसाठी नाही तर औषधी म्हणूनही केला जातो. आयुर्वेदानुसार मेथी कडू चवीची आणि उबदार प्रकृतीची असल्याने ती कफ व वात नियंत्रित करते, मात्र पित्त वाढवू शकते. म्हणून पित्त प्रकृतीच्या लोकांनी तुपासोबत तिचे सेवन करावे असा सल्ला दिला जातो.
मेथीच्या दाण्यांमध्ये असलेले सॉल्युबल फायबर ब्लड शुगरवर नियंत्रण ठेवते व कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करते. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्यांना याचा विशेष फायदा होतो. पचन सुधारण्यासाठी मेथी उपयुक्त असून अपचन, पोटफुगी अशा समस्या कमी होतात. याशिवाय कोलेस्ट्रॉल शोषणावरही नियंत्रण मिळवत असल्याने हृदयविकाराचा धोका घटतो.
वजन कमी करण्यासाठी मेथी प्रभावी आहे कारण ती पोट भरल्यासारखी भावना निर्माण करते. स्तनपान करणाऱ्या महिलांमध्ये दूध वाढवण्यास देखील ती मदत करते. मेथीची पाने अँटीऑक्सीडंट्स, जीवनसत्त्वे व इंफ्लेमेशन कमी करणारे गुणधर्म याने परिपूर्ण आहेत.
सेवनासाठी रात्री एक चमचा मेथी पाण्यात भिजवून ठेवून सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी पिणे फायदेशीर ठरते. बिया थेट चावून खाऊ शकता किंवा गिळूनही घेता येतात. या बिया भाजी, डाळ, सलाड किंवा सूपमध्येही वापरता येतात. मात्र प्रौढांसाठी ५ ते २० ग्रॅम इतकेच प्रमाण योग्य आहे. सुरुवातीला कमी प्रमाणात सुरू करावे कारण काहींना पचनासंबंधी त्रास किंवा अलर्जी होऊ शकते. डायबिटीजचे औषध घेणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.