दि बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा दारूण पराभव झाला आहे. (Raj Thackeray meets CM Fadnavis) त्यामुळे सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे ब्रँडवर टीकास्त्र डागण्यात येत आहे. पण या निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जरी पराभव झालेला असला तरी सत्ताधारी मात्र केवळ आणि केवळ उद्धव ठाकरेंनाच लक्ष करताना पाहायला मिळत आहेत. पण हा निकाल लागल्याच्या एका दिवसांतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. गुरुवारी (ता. 21 ऑगस्ट) सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला काही पहिल्यांदाच गेलेले नाही. याआधी सुद्धा दोन महिन्यांपूर्वी ताज लँड्स या हॉटेलमध्ये या दोन्ही नेत्यांनी एकमेकांची भेट घेतली होती. पण त्यावेळी या दोघांमध्ये हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून चर्चा झाली, असल्याचे सांगण्यात आले होते. तर त्याआधी स्वतः देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरेंच्या निवासस्थानी भेटीला गेले होते. पण आता बेस्टच्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यानंतर आणि भाजपाच्या काही नेत्यांनी राज ठाकरेंना सुद्धा लक्ष केल्यानंतर ही भेट म्हणजे काही राजकीय संकेत तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण राज ठाकरेंनी नागरिकांच्या समस्येसंदर्भात चर्चा करण्यासाठी ही भेट घेतली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.