बेस्ट पतपेढी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी ठाकरे बंधूंना भोपळाही फोडता आला नाही आणि ठाकरे गटाने बेस्ट पतपेढीतील 9 वर्षांची सत्ता गमावली आहे. यावेळी शशांक राव (Shashank Rao) यांच्या पॅनलने सर्वाधिक 14 उमेदवार विजयी झाले. तर, प्रसाद लाड यांच्या पॅनलचे 7 उमेदवार विजयी झाले. यानंतर आता शशांक राव यांनी विहायाबद्दल आनंद व्यक्त केला तर ठाकरे बंधूंच्या पॅनलवरही निशाणा साधला. ” कामगारांचे कामच केले नाहीतर कोणीही एकत्र आले तरीही असाच भोपळा मिळणार,” असे म्हणत त्यांनी विजयानंतर ठाकरे बंधूंवर निशाणा साधला.
“दोन भाऊ एकत्र आले की नाही? हा प्रश्न नाही. तुम्ही कामगारांसाठी काम कराल तेव्हा ते निवडून देतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मदत केली आणि आशिष शेलार यांनीही आम्हाला मदत केली आहे. आम्ही एकूणच कामगारांसाठी काम केले आहे. त्याची ही पोचपावती आहे.” अशा भावना शशांक राव यांनी व्यक्त केली. तसेच, यावेळी भाजपसोबत आहे की नाही? यावरही भाष्य केले. ते म्हणाले की, “आमची संघटना कोणत्याही पक्षाशी संबधित नसते. अनेक कामगार नेते हे या संघटनेचे अध्यक्ष राहिले आहेत. ही एक कामगारांची संघटना आहे. त्यांच्यासाठी काम करणारी संघटना आहे. मुख्यमंत्री फडणवीस कामगारांना मदत करतात.” असे ते म्हणाले. “आम्ही कामगारांच्या हिताचे काम केले आहे. कोणीही एकत्र आले तरी काम केलेच नाही तर असेच भोपळे मिळणार. ब्रँड अनेक असतील पण कामगारांच्या हिताचे काम करेल तोच जिंकेल.” असेही ते यावेळी म्हणाले.
Shashank Rao स्वत:च्या फायद्यासाठी ठाकरेंकडून बेस्टचे नुकसान
“शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बेस्टमध्ये कामगारविरोधी आणि खासगीकरणाचे धोरण चालवत आली आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून कामगारांनी शिवसेना उबाठाने धोरणाविरोधात आपले मत नोंदवले. आमचा लढा आम्ही जिंकला असून बेस्टची जी दशा झाली आहे त्या दशेला शिवसेना उबाठा आणि त्यांची बेस्ट कामगार युनियन जबाबदार आहे. बेस्ट कामगार युनियन कमिटीत असताना त्यांनी बेस्टचे मोठे नुकसान केले. आम्ही कामगार अनेक वर्षे कामगारांचा लढा देत आहोत. तोच मुद्दा आम्ही कामगारापर्यंत नेला आणि कामगारांनी आमच्या बाजूने मत नोंदवले.” असे शशांक राव म्हणाले. कामगार नेते शशांक राव म्हणाले की, “शिवसेना उबाठा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती आम्हाला आव्हान वाटत नव्हती. कारण दोन भाऊ एकत्र आले किंवा नाही हा प्रश्नच नव्हता. तुम्ही कामगारांसाठी काम केले तर तुम्ही एकटे असाल तरी कामगार तुम्हाला निवडून देतात आणि कामगारांनी नेमके तेच करून दाखवले. आमच्या एवढ्या वर्षांच्या लढाईला यश मिळाले.” असे त्यांनी मत व्यक्त केले.