2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आम आदमी पक्षावर मात करत दिल्लीमध्ये भाजपची सत्ता स्थापन केली. यानंतर अरविंद केजरीवाल यांचे सरकार गेले आणि रेखा गुप्ता (Attack On Rekha Gupta) यांचे भाजप सरकार दिल्लीत स्थापन झाले. त्यावेळेस तीन टर्म गाजवणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचा पराभव केल्यामुळे रेखा गुप्ता चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. मात्र, आता पुन्हा एकदा त्या प्रकाशझोतात आल्या आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी (20 ऑगस्ट) सकाळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. दिल्लीतील सिव्हिल लाईन्स येथे जनसुनावणी घेत असताना गर्दीतील एका व्यक्तीने मुख्यमंत्र्यांना एक कागद सोपवताना कानशिलात लगावाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडे 8 वाजता दिल्लीचा मुख्यमंत्री रेखा गुप्ता या सीएम सिव्हिल लाईन्स निवासस्थानी जनसुनावणी घेत होत्या. त्याच वेळी गर्दीतून एक व्यक्ती मुख्यमंत्र्यांना एक कागद देत होती. मुख्यमंत्र्यांना काही समजण्याआधीच त्या व्यक्तीने त्यांना कानशिलात लगावली. घटनेनंतर लगेचच जवळ उभ्या असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला पकडले आहे. दिल्ली पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. तो व्यक्ती कोण होता? त्याने कोणत्या उद्देशाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला? याचा तपास केला जात आहे. या हल्ल्यानंतर मात्र भाजपचे अनेक नेते तसेच दिल्ली पोलिसांचे उच्च अधिकारी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत.
आरोपी व्यक्ती एखाद्या गोष्टीमुळे नाराज होती का? की हा हल्ला कटाचा भाग म्हणून करण्यात आला आहे. याबाबत आता दिल्ली पोलीस तपास घेत आहेत. पोलिसांनी अद्याप हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख उघड केलेली नाही. चौकशीनंतर त्याची ओळख स्पष्ट झाल्यानंतर सर्व माहिती देण्यात येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ल्यानंतर सीएमओने एक निवेदनही जारी केले आहे. दिल्लीच्या सीएमओने सांगितले की, आज सार्वजनिक सुनावणीदरम्यान एका व्यक्तीने मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला केला. आरोपीला दिल्ली पोलिसांनी पकडले आहे आणि त्याची चौकशी केली जात आहे. सिव्हिल लाईन्स परिसरातील राजनिवास मार्गावर असलेले ‘मुख्यमंत्री जनसेवा सदन’ कॅम्प ऑफिस अलीकडेच सार्वजनिक सुनावणीसाठी सुरू करण्यात आले आहे. लोक इथे सार्वजनिक समस्या ऐकण्यासाठी येतात आणि सुनावणी कार्यक्रमानंतर संबंधित विभागाच्या जबाबदार लोकांना समस्या सोडवण्याचे निर्देश दिले जातात.