महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक निकालाच्या (Maharashtra Election) वैधतेलाच आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. या आधी मुंबई उच्च न्यायालयानेही संबंधित याचिका फेटाळली होती. त्यानंतर याचिकाकर्ता सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्या. एम. एम. सुंद्रेश आणि न्या. एन. के. सिंग यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळली.मुंबई पर्यटन
चेतन चंद्रकांत अहिरे यांनी संबंधित याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत 75 लाख बोगस मतदारांनी मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर मतदान केले असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ही संपूर्ण निवडणूकच अवैध ठरविण्यात यावी, अशी मागणी केली होती. जून 2025 मध्ये याच याचिकाकर्त्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली होती. महाराष्ट्रातील एकूण 95 मतदारसंघांमध्ये मतमोजणीमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. या मतदारसंघांमध्ये मतदान झालेली आकडेवारी आणि मतमोजणीचे आकडे हे जुळत नसल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले होते. पण आपल्या युक्तिवादाला पूरक असे कोणतेही पुरावे याचिकाकर्ते उच्च न्यायालयात देऊ शकले नव्हते.
उच्च न्यायालयाने संबंधित याचिका फेटाळताना म्हटले होते की, संबंधित याचिका ही पूर्णपणे निराधार असून, त्यामुळे न्यायालयाचा महत्त्वाचा वेळ वाया गेला आहे. खरंतर आम्ही याचिकाकर्त्याकडून दंडच आकारला पाहिजे. पण तूर्त आम्ही तसा काही निर्णय घेणार नाही, असे उच्च न्यायालयाचे न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. अरिफ डॉक्टर यांनी म्हटले होते. उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतरच संबंधित याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात गेले होते. पण तिथेही त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे.