गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह उपनगर आणि ठाणे, (Mumbai Local) कल्याण परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. अशामध्ये मंगळवारी (19 ऑगस्ट) सकाळी 11नंतर मुंबई रेल्वे सेवा ठप्प झाल्याचे समोर आले आहे. मध्य रेल्वेवर ठाणे ते सीएसएमटी आणि हार्बर रेल्वेसेवा ठप्प झाली. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे कुर्ला ते सायन लोकल स्थानकाच्या दरम्यान पाणी साठल्याने ट्रॅकवर पाणी साचले. विशेष म्हणजे कुर्ला स्थानकाजवळील 8 रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचे दिसून आले. तसेच, वडाळा ट्रॅकवरही पाणी साठल्याचे दिसून आले. तर, चुनाभट्टी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मला पाणी लागल्याचे दिसून आले.
ठाणे, कुर्ला आणि दादर रेल्वे स्थानकावर रेल्वे ठप्प केल्याच्या घोषणा केल्या आहेत. तसेच, रेल्वे मध्यातच बंद पडल्याने प्रवास करणारे ट्रॅकवर उतरले आणि चालू लागल्याचे समोर आले. मध्य रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, प्रचंड पाऊस आणि भरती सुरू असल्यामुळे महानगरपालिकेने फ्लड गेट्स उघडले होते, ज्यामुळे समुद्राचे पाणी मुंबईत शिरण्यापासून रोखले जात आहे. सध्या हे फ्लड गेट बंद करण्यात आले आहेत. कुर्ला, सायन, चुनाभट्टी, टिळक नगर यासह मिठी नदीजवळ असलेल्या परिसरांमध्ये पाणी साचले. दादरसारख्या स्टेशनमध्येही पाणी भरल्याने लोकल सेवेला प्रत्यक्ष फटका बसला आहे.
महापालिका प्रशासनाकडून नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले जात आहे. काही हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आली आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सध्या सायन आणि दादर दरम्यान अनेक लोकल उभ्या आहेत, पण पाण्याची पातळी ओसरल्यावरच वाहतूक पुन्हा सुरू होईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच, रेल्वे ट्रॅकवर पाणी सुरू असल्यामुळे मध्य रेल्वेच्या काही ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे आणि प्रवाशांना अद्याप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, हवामान खात्याने मुंबई शहर आणि उपनगरमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेकडून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणून जाहीर करण्यात आलेल्या आदेशानुसार, मुंबईतील सर्व शासकीय, निमशासकीय तसेच महापालिका कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.