मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वसई-विरार तसेच कोकण किनारपट्टीवर (Mumbai Rain) रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागांत पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली असून, मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा पूर्णपणे अडचणीत सापडली आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण, ठाणे, दादर या प्रमुख स्थानकांवरील रुळांवर पाणी साचल्यामुळे अप-डाऊन दोन्ही मार्गांवरील लोकल गाड्या 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. परिणामी, कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत.
पश्चिम रेल्वे मार्गावरही गाड्या 15 ते 20 मिनिटांचा विलंब घेत आहेत. काही ठिकाणी पाण्यामुळे गाड्यांचा वेगही कमी करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर तर मानखुर्द, कुर्ला, गोवंडी व टिळक नगर या सखल भागांत पाणी साचल्याने गाड्या 30 मिनिटांपर्यंत उशिरा धावत आहेत.
हवामान विभागाने पुढील 24 तास मुसळधार पावसाचा इशारा दिल्यामुळे अनेक चाकरमान्यांनी घरूनच काम करण्याचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे स्थानकांवरील गर्दी काहीशी कमी आहे. मात्र प्रवास करणाऱ्यांना अजूनही प्रतीक्षेचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने सर्व प्रवाशांना विनंती केली आहे की, प्रवासाआधी रेल्वेची ताजी माहिती घ्यावी आणि आवश्यक असेल तरच प्रवास करावा.