उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीकडून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सुदर्शन रेड्डी B. Sudershan Reddy यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी याबाबतची घोषणा केली आहे. त्यामुळे आता उपराष्ट्रपतीपदासाठी एनडीएच्या सीपी राधाकृष्णन यांच्यात थेट लढत होणार आहे.
B. Sudershan Reddy कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी?
बी सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि गोव्याचे पहिले लोकायुक्त होते. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील रंगा रेड्डी जिल्ह्यातील अकुला मैलाराम गावात एका शेतकरी कुटुंबात झाला असून, सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी १९७१ मध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.
रेड्डी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात नागरी आणि संवैधानिक बाबींमध्ये सराव करून केली आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील के. प्रताप रेड्डी यांच्यासोबत काम केले. त्यानंतर ८ ऑगस्ट १९८८ रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आणि ते केंद्र सरकारचे अतिरिक्त स्थायी वकील बनले.
१९९३ मध्ये, ते आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या वकिलांच्या संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले आणि उस्मानिया विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार देखील होते. रेड्डी यांना २ मे १९९३ रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर, ५ डिसेंबर २००५ रोजी ते गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. त्यानंतर सुदर्शन रेड्डी यांची १२ जानेवारी २००७ रोजी सर्वोच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आणि ते ८ जुलै २०११ रोजी निवृत्त झाले. निवृत्तीनंतर मार्च २०१३ मध्ये गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून पदभार स्वीकारला, मात्र, वैयक्तिक कारणांमुळे ऑक्टोबर २०१३ मध्ये त्यांनी राजीनामा दिला.
B. Sudershan Reddy सुदर्शन रेड्डी यांना उमेदवार का बनवण्यात आले?
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपने तामिळनाडूमधून सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी दिली आहे. दक्षिणेतील राजकारण समोर ठेवत ही एक चाल म्हणून पाहिले जात आहे. या लढाईत काँग्रेसही मागे राहू इच्छित नसल्याने विरोधकांकडून रेड्डी यांना रिंगणात उतरवण्यात आले आहे. सुदर्शन रेड्डी हे तेलंगणातील जात सर्वेक्षण पथकाचे प्रमुख होते. तेलंगणातील जात सर्वेक्षणाचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने जात जनगणनेचा मुद्दा उपस्थित करत आहेत. त्यामुळे रेड्डी यांना उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीत आणून पक्षाकडून या मोहिमेला अधिक धार देण्याचा प्लान आहे.