राज्यात तीन-चार दिवसांपासून पावसाने थैमान घातले आहे. राज्यात कोसळधार सुरू असल्याने अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने संसार पाण्यात गेले आहे. मुंबई आणि उपनगरांना येत्या 12 तासांत रेड अलर्ट आहे. तर ऑरेज अलर्ट जारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षातून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला. राज्यात झालेल्या नुकसानीची त्यांनी माहिती दिली. तर उपाय योजनांविषयीच्या सूचना दिल्याचे सांगितले.
अजितदादांनी मुंबई आणि परिसरातील परिस्थितीचा आणि राज्यातील पूर स्थितीचा आढावा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून घेतला. मिठी नदीची पाणी पातळी वाढत चालल्याने सुट्टी जाहीर केल्याचे ते म्हणाले. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहचवण्याचे नियोजन सुरू आहे. मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, रत्नागिरी या भागाला रेडअलर्ट जारी करण्यात आला आहे. दर तीन तासांनी हवामान खाते अहवाल देत आहे. सरकारचे मुंबईत गरजेचे नसेल तर बाहेर न पडण्याचेआवाहन आहे.
राज्यात घाटमाथ्यावर रेड अलर्ट आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज 11 वाजता बैठक तर मंत्रिमंडळाची 12 वाजता बैठक आहे. 36 जिल्ह्यांतील प्रशासन अलर्ट मोडवर आहे. सगळे जण परस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. त्याचे आकडेवारी 12 वाजेपर्यंत येतील. जनावरे वाहून गेली आहेत. पाण्याची धोक्याची पातळी रत्नागिरी, खेड, चिपळून या भागात वाढली आहे. संपूर्ण राज्यात पावसाची संततधार आहे. काही गावं पाण्याखाली आहे. संपूर्ण राज्यात पावसाने थैमान घातले आहे.
राज्यातील 10 लाख एकर जमीन पाण्याखाली गेली आहे. पंचनामे काम करण्याचे काम सुरू होतील. नागरिकांनाजिथे पुराचा फटका, पावसाचा फटका बसला आहे, तिथे बोटीद्वारे सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. तर खबरदारी घेण्याचे आदेश जलसंपदा विभागाला देण्यात आले आहे. धरणं बहुतेक ठिकाणी ओव्हरफ्लो झाली आहे. त्यामुळे पाणी सोडताना खबरदारी घेण्यास सांगण्यात आले आहे. पूर नियंत्रण करण्यासाठी प्रत्येक धरणावर कार्यकारी अभियंता त्या दर्जाचा अधिकारी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कॅचमेट भागात येवा सुरू आहे. काही नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. तर शेजारच्या राज्यांची पण मदत घेण्यात येत आहे. कारण खाली त्यांनी पाणी सोडले नाही तर पाणी फुगवटा होऊ शकतो, अजितदादांनी असे स्पष्ट केले.
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून तातडीने आपल्याला पावसाची अपडेट मिळत आहे. पावसाची परिस्थिती आपल्याला कळत आहे. अडचणीत, बाधीत लोकांना मदत करण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करत आहे. ज्या ज्याठिकाणी तातडीच्या मदतीची गरज आहे, तिथे स्थानिक प्रशासन ती पुरवत आहे. राज्यातील जनतेला आवाहन करत आहे की कोणीही घाबरून जाऊ नका. बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे अजितदादा म्हणाले.