आज सोमवार (दि. 18)रोजी दी बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी (BEST Election 2025) मुंबईत मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटआणि मनसे यांनी एकत्रितरित्या उत्कर्ष पॅनल उभे केले आहे. तर, महायुतीच्यावतीने सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवण्यात आलं आहे. यामध्ये प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा, नितेश राणे यांची समर्थ बेस्ट कामगार संघटना आणि शिंदेंच्या सेनेचे किरण पावसकर यांची राष्ट्रीय कर्मचारी सेना यांचा समावेश आहे.
यासोबतच शशांक राव यांचा शशांक राव पॅनेल आणि मुंबई इलेक्ट्रिक वर्कर्स युनियनचा बेस्ट परिवर्तन पॅनेलदेखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ही निवडणूक रंगतदार होणार आहे. कारण ऐन मतदानाच्या आदल्या दिवशी आर्थिक गुन्हे शाखेची या निवडणुकीत एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत महायुतीच्यावतीने मागील अनेक वर्षे पतसंस्थेवर सत्ता असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला आहे. आज मतदान पार पडल्यानंतर मंगळवारी 19 तारखेला मतमोजणी होणार आहे.
ही निवडणूक गेल्या चार वर्षांपासून रखडली होती. या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी युती केल्यामुळे या निवडणुकीविषयीची उत्सुकता वाढली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वीची लिटमस टेस्ट म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. 21 पैकी 19 जागा ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलमध्ये ठाकरे गट आणि मनसेकडून दोन जागा लढवण्यात येतील. निवडणुकीच्या काही दिवस आधी शिंदे गटाच्या माझगाव येथील कर्मचारी बबिता पवार यांनी ठाकरे बंधूंच्या पॅनेलमध्ये प्रवेश केला होता. ठाकरे बंधूंनी ही निवडणूक जिंकल्यास ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्यादृष्टीने सकारात्मक संदेश जाईल.
बेस्ट क्रेडिट सोसायटी निवडणुकीच्या मतदानाला 24 तास शिल्लक असतानाच आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) 21 संचालकांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आल्याने वाद निर्माण झाला. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी 24 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार बेस्ट पतसंस्थेच्या निवडणुकीत झाल्याचा आरोप केला होता. चौकशीची मागणी त्यांनी याप्रकरणी केली होती.लाड यांचा पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष उमेश सारंग आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांची चौकशी झाली पाहिजे, असा आग्रह होता. मात्र, अवघे काही मतदानाला तास शिल्लक असताना संचालकांना नोटीस धाडण्यात आल्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.