मुंबईत शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे. (Mumbai Rain Alert) अनेक सखल भागांमध्ये त्यामुळे शहर आणि उपनगरातील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत पावसाचा जोर चढताना आणि मध्येच कमी होताना पाहायला मिळत आहे. अशातच आता भारतीय हवामान विभागाकडून मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पावसाचा रेड अलर्ट अर्थात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी महत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे. अशातच मुंबई पोलिसांकडून सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईकरांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह संपूर्ण राज्यात भारतीय हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. परंतु, मुंबई पोलिसांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत नागरिकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सध्या मुंबईमध्ये सुरू असलेला संततधार पाऊस व हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर जाणे टाळावे. तसेच समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळा. पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून @MumbaiPolice सतर्क व मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. 100 / 112 / 103 कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास डायल करा.” असे आवाहन पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
तर, हवामान विभागाकडून गेल्या काही तासांमध्ये नागरिकांच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज पाठवून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. रत्नागिरी, रायगड, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर जिल्ह्यातील काही ठिकाणीपुढील तीन तासात मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, असे मेसेज प्रादेशिक हवामान विभाग आणि मंत्रालयाकडून पाठवण्यात येत आहेत. परंतु, अनेक गोविंदा पथक तसेच अनेक मुंबईकर आज दहीहंडी उत्सव असल्या कारणाने घराबाहेर पडण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे त्यांची सुरक्षा करणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान असणार आहे.