अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय (Donald Trump) त्यांच्याच देशातील लोकांसाठी त्रासदायक ठरत आहेत. आताही ट्रम्प यांचं एक पाऊल लाखो कुटुंबांच्या अडचणी वाढवणारं ठरणार आहे. ट्रम्प यांच्या प्रशासनाने यावर्षात तब्बल तीन लाख सरकारी नोकऱ्या संपवण्याचा प्लॅन तयार केला आहे. यामुळे फेडरल वर्कफोर्समध्ये मोठी कपात होईल. ऑफीस ऑफ पर्सनल मॅनेजमेंटचे नवीन डायरेक्टर स्कॉट कूपर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, प्रशासनाच्या या हालचालींमुळे सरकारी नोकरदार वर्गात मोठी खळबळ उडाली आहे.
जानेवारी महिन्यात सत्ता हाती घेताच ट्रम्प यांनी 24 लाख फेडरल सिविलियन वर्कफोर्स कमी करण्याची मोहिम सुरू केली होती. कूपर यांनी सांगितले, ही कर्मचारी कपात फेडरल वर्कफोर्समध्ये जानेवारीपासून आतापर्यंत जवळपास 12.5 टक्के इतकी असेल. कपात केल्या जाणाऱ्या कर्मचाऱ्यांत 80 टक्के कर्मचारी स्वेच्छेने नोकरी सोडणारे असतील. तर 20 टक्के कर्मचाऱ्यांना बरखास्त करण्यात येईल. हा आकडा मागील महिन्यात रॉयटर्समधील रिपोर्टमध्ये प्रकाशित झालेल्या 1.54 लाख कर्मचाऱ्यांचा दुप्पट आहे. ज्यांनी स्वइच्छेने रिटायरमेंट पॅकेज घेतले होते.
Donald Trump कर्मचारी कपातीचं कारण काय
डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की वर्कफोर्स गरजेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे कामकाज व्यवस्थित होत नाही. कोणत्याही कर्मचाऱ्याला बळजबरीने नोकरी सोडण्यास भाग पाडले जाणार नाही. याआधी ओपीएम नेतृत्वाने नवीन कर्मचाऱ्यांना सरळ हटवण्याचे आदेश दिले होते. या आदेशाचा विचार केला तर कूपर यांचे आताचे वक्तव्य वेगळे आहे. न्यायालयाच्या फायलिंगमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे.
Donald Trump फेडरल वर्कफोर्सचं काम काय
Economic Policy Institute नुसार ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या सुरुवातीला अमेरिकेच्या फेडरल वर्कफोर्समध्ये जवळपास 30 लाख कर्मचारी होते. यातील बहुतांश कर्मचारी वॉशिंग्टन डीसीच्या बाहेर राहतात आणि काम करतात. निम्मे सरकारी कर्मचारी तर 10 वर्षांहून अधिक काळापासून या सेवेत आहेत. हे कर्मचारी अशी कामे करतात जी केली नाही तर अमेरिकी लोकांचे दैनंदिन आयुष्य कठीण होईल. या कर्मचाऱ्यांचा पगारही अन्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या तुलनेत अतिशय कमी आहे. ट्रम्प यांचा या सरकारी कर्मचाऱ्यांवर विशेष राग आहे. हे कर्मचारी देशाचं वाटोळं करणारे, आळशी आणि बेकार आहेत असे ट्रम्प अनेकदा सांगत असतात.