केक (Cake) म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. पण आजच्या हेल्दी लाईफस्टाईलमध्ये साखर आणि रिफाइंड मैद्यापासून बनलेले पदार्थ टाळण्याकडे अनेकांचा कल आहे. अशावेळी साखर व मैदा टाळूनसुद्धा स्वादिष्ट केक बनवता येतो.
यासाठी लागणारे साहित्य अगदी सोपे आहे. एक कप रवा, 15-18 बियाशिवाय खजूर (गोडपणासाठी), एक कप दूध, अर्धा चमचा बेकिंग पावडर, अर्धा चमचा बेकिंग सोडा, अर्धा कप दही, 1/4 कप तेल (ऑलिव्ह ऑइलही चालेल), सुकामेवा (बदाम, अक्रोड, काजू, मनुका), एक चमचा व्हॅनिला एसेन्स आणि चिमूटभर मीठ.
सर्वप्रथम खजूर कोमट दुधात अर्धा तास भिजवून मऊ करून पेस्ट बनवावी. नंतर दही, तेल आणि व्हॅनिला एसेन्स एकत्र फेटून गुळगुळीत मिश्रण तयार करावे व त्यात खजूर पेस्ट मिसळावी. गोडवा वाढवायचा असल्यास मध किंवा गूळही घालता येतो.
एका भांड्यात रवा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मीठ चाळून घ्यावे. हे मिश्रण दही-तेलाच्या पेस्टमध्ये मिसळून बॅटर तयार करावे आणि 20 मिनिटे झाकून ठेवावे.
यानंतर बॅटर कोरडे दिसल्यास थोडं दूध घालून सुकामेवा मिसळावा. ओव्हन 180°C वर प्रीहीट करून, बटर लावलेल्या केक मोल्डमध्ये बॅटर ओतून त्यावर उरलेला सुकामेवा पसरवावा. साधारण 30-35 मिनिटांत केक बेक होईल. टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर केक तयार.
थंड झाल्यावर हा साखर-मुक्त रवा केक सर्व्ह करा आणि guilt-free स्वादाचा आनंद घ्या.