वरळी बीडीडी चाळीतील दोन पुनर्वसित इमारतीमधील 556 घरांचा ताबा गुरुवारी (14 ऑगस्ट) घरमालकांना देण्यात आल्या. या घरांच्या चावी वाटपाचा कार्यक्रम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadnavis) तसच दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही घरे लगेच विकू नका, असा सल्ला दिला. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील त्यानंतर भाषण करणाऱ्या ही घरे सोन्यासारखी जपून ठेवा, असा सल्ला दिला. तसेच, आता धारावीचाही बीडीडी चाळीप्रमाणेच असाच पुनर्विकास करू आणि सामान्य मराठी माणसाला हक्काचे घर मिळवून देऊ, असा विश्वास व्यक्त केला.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “ही घरे विकू नका. पूर्वी आपल्याकडे पुढच्यापिढीला देण्यासाठी सोने सांभाळून ठेवायची. पण सध्या मुंबईमध्ये सोन्यासारखी घरांची किंमत आहे. त्यामुळे पुढच्या पिढ्यांना काय द्यायचे? तर ही घरे आपल्या पुढच्या पिढ्यांना द्यायचे आहे, असा विश्वास मनामध्ये ठेवा.” असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. “आज अतिशय आनंदाचा दिवस आहे. जे स्वप्न आपण पाहिले होते ते अखेर पूर्ण झाले आहे. बीडीडी चाळीने अनेक सामाजिक आंदोलने आणि चळवळी बघितल्या. या 100 वर्षांमध्ये बीडीडी चाळीचा इतिहास पाहिला तर या चाळीच्या भिंतीमध्ये अनेक गोष्टी दडल्या आहेत. अनेकांचे दुःख दडलेले पाहायला मिळतात.” असे म्हणत त्यांनी आनंद व्यक्त केला.
“सातत्याने बीडीडी चाळीचा विकास झाला पाहिजे, अशी मागणी होत होती. काही लोकांच्या घरी जाण्याचा प्रसंग आला. तेव्हा मी पाहिले की लोक कशा अवस्थेत राहत आहेत. मला असे वाटले की म्हणायला ती चाळ होती पण झोपडपट्टीपेक्षा बिकट अवस्था होती. म्हणूनच आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महायुतीचे सरकार आले तेव्हा बीडीडी चाळीचा मुद्दा पहिल्यांदा ऐरणीवर घेतला. यामध्ये अनेक अडचणी आल्या,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. “मला सांगताना आनंद वाटतो की, आपण जबाबदारी घेत त्याचे ग्लोबल टेंडर काढले. वरळीमध्ये टाटा, एलएनटीने हे काम घेतले. 22 एप्रिल रोजी सर्व टेंडर काढून त्याचे भूमिपूजन केले होते. त्यानंतरही अनेक अडचणी आल्या. पण सर्व अडचणींवर मात काढत अत्यंत वेगाने आपण या कामाला सुरुवात केली. आज लोकांना घरे दिली.” असे ते पुढे म्हणाले.