राज्य सरकारच्या मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin Yojana) योजनेबाबत महत्वाची बातमी आहे. या योजनेत 26 लाख लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यातच एक खळबळ उडवून देणारी बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. जिल्ह्यातील तब्बल 1 लाख 4 हजार महिला योजनेच्या अटी पूर्ण करत नसल्याची माहिती समोर आली आहे. या लाभार्थ्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांचे दीड हजार रुपये मानधन तातडीने थांबवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
लाडकी बहीण योजनेत अनेक गैरप्रकार समोर येत आहेत. या योजनेत जवळपास 14 हजार पुरुषांनी लाभ घेतल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या पुरुषांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे राज्यातील 26 लाख लाभार्थ्यांची पडताळणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता.
यानुसार जिल्ह्यांना याद्या पाठवण्यात आल्या. त्यानंतर अंगणवाडी सेविकांमार्फत या कामाला सुरुवात झाली आहे. योजनेतील निकषांच्या आधारे अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन लाभार्थ्यंची पडताळणी करत आहेत. काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांकडून या कामास विरोध होत आहे तर काही जिल्ह्यात पडताळणीच्या कामाने वेग घेतला आहे. यातच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या संख्येने अपात्र लाभार्थी असल्याचे दिसून आले आहे.
Ladki Bahin Yojana पडताळणीत धक्कादायक खुलासा
विशेष म्हणजे यातील 84 हजार अर्ज एकाच घरातील तीन महिलांचे असल्याचे समोर आले आहे. योजनेतील निकषानुसार एका घरातील फक्त दोन महिला लाभ घेऊ शकतात. परंतु, अनेक कुटुंबे अशी आहेत त्या कुटुंबातील तीन तीन महिला लाभ घेत आहेत. 20 हजार अर्ज 21 वर्षांखालील किंवा 65 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या लाभार्थ्यांचे आहेत.
आता या सर्व अपात्र लाभार्थ्यांचा निधी थांबवण्यात आल्याची माहिती आहे. या योजनेसाठी जिल्ह्यात एकूण 10 लाख 15 हजार 834 अर्ज आले होते. त्यापैकी 9 लाख 24 हजार 348 अर्ज मंजूर झाले होते. अर्ज मंजूर करताना निकष पाहिले पाहिजे होते. परंतु, सुरुवातीच्या टप्प्यात अंगणवाडी सेविकांनी निकषांचा विचार न करता अर्ज मंजूर केले होते. त्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने अर्ज मंजूर झाले होते. आता निकषांनुसार अर्जांची पडताळणी करण्यात येत आहे.