शहरातील कल्याणीनगर परिसरामध्ये 19 मे 2024 रोजी रात्रीच्या सुमारास भीषण कार (Porsche Car Accident) अपघात घडला. एका बड्या बापाच्या पोराने भरधाव वेगात पोर्शे कार चालवत दोघांचा जीव घेतला. या घटनेनंतर अनेक नाट्य पाहायला मिळाले. कारण या बड्या बापाच्या पोराला वाचवण्यासाठी पोलिसांसह डॉक्टर आणि पुण्यातील काही नेतेमंडळी सुद्धा कामाला लागली. या प्रकरणातील आरोपी पोराच्या वडिलांनी आपल्या बळाचा वापर करून पुराव्यांशी छेडछाड केली होती, असा आरोप आहे. अल्पवयीन मुलगा ही घटना ज्या दिवशी घडली त्या दिवशी दारूच्या नशेत होता. पण या प्रकरणी सर्व पुरावे असताना सुद्धा बाल न्याय मंडळाने त्याला जामीन मंजूर केला. पण बाल न्याय मंडळाने दिलेल्या निर्णयाविरोधात आता पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात धाव घेतली आहे.
पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन कारचालकावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवण्याची मागणी पुणे बाल न्याय मंडळांनी फेटाळल्यानंतर पुणे पोलीस सत्र न्यायालयात गेले आहेत. बाल न्याय मंडळाच्या निर्णयात त्रुटी असल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. कारचालकाचा गुन्हा कल्याणी नगर अपघात प्रकरणात निर्घृण श्रेणीत मोडत नसल्याचा निकाल बाल न्यायालय मंडळाने दिला होता. या निकालात स्पष्टता नसल्याचा दावा करून पुणे पोलिसांनी सत्र न्यायालयात अपील केले आहे. चुकीच्या गृहीतकावर बाल न्याय मंडळाचा निकाल आधारित असून त्यामध्ये स्पष्टता नाही. अल्पवयीन चालकाचा गुन्हा अगदी गंभीर श्रेणीत येत असून त्याच्यावर प्रौढ म्हणून फौजदारी खटला चालवण्यात यावा, असे पुणे पोलिसांनी म्हटले आहे.
Porsche Car Accident नेमके प्रकरण काय?
दारुच्या नशेत भरधाव वेगात पुण्यातील बडे बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने कार चालवत दोन बाईकस्वारांना उडवले होते. अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांचा यात मृत्यू झाला. धडक ही एवढी जोरदार होती की, मागील बाईकवर सीटवरील अश्विनी 15 फूटांपर्यंत वर फेकली गेली होती. कल्याणीनगर परिसरातील बार, पब्जमध्ये मद्य प्राशन करुन बड्या उद्योजकाचा मुलगा त्याच्या मित्रांसह मध्यरात्रीनंतर भरधाव वेगात निघाला होता. याप्रकरणी धनिकपुत्राला वाचवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार, पोलीस यंत्रणा आणि आरोग्य विभागातील डॉक्टर आणि कर्मचारीही मध्यरात्रीच कामाला लागले होते.