मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना परभणी दौऱ्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी असताना गंभीर इशारा दिला. फडणवीसांनी गोव्यातील एका ओबीसी मेळाव्यात (OBC Meeting) जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरले आहेत. त्यांचा राज्यात दंगली घडवण्याचा डाव आहे. तसं काही करण्याचा प्रयत्न केला, तर महाराष्ट्र कायम स्वरुपी बंद राहील, असा इशारा जरांगेंनी दिला.
Manoj Jarange Patil फडणवीसांना माझ्यावर हल्ला करायचाय…
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि ‘सगेसोये अध्यादेश लागू करावा, या मागण्यांसाठी जरांगेंचा मोर्चा 29 ऑगस्टला मुंबईत धडकणार आहे. जरांगेंनी समाज बांधवांना या मोर्चात सामील होण्याचे आवाहन केलं. या पार्श्वभूमीवर ते मराठवाड्यात संवाद दौरा करत आहे. आज परभणी येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यातील एका ओबीसी मेळाव्यात जाऊन ओबीसी नेत्यांचे कान भरले आहेत. आंदोलनादरम्यान राज्यात दंगली भडकवण्याचा कट रचला असून मला याची कुणकुण लागली आहे. फडणवीस हे षडयंत्र रचत असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. आधी चर्चा खोटी वाटत होती, मात्र सिद्ध झाले आहे. मी मॅनेज होत नाहीय, त्यामुळ फडणवीसांना माझ्यावर हल्ला करायचा आहे, असं जरांगे म्हणाले.
ते म्हणाले, आमचे आंदोलन शांततेत होणार आहे. पण फडणवीसांनी जर तसं काही करण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्र कायम स्वरुपी बंद राहील. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मोठा त्रास सहन करावा लागेल, असा इशारा जरांगेंनी दिला.
पुढं जरांगे म्हणाले, फडणवीस यांनी गोव्यामध्ये ओबीसी अधिवेशन घेतले, मी ओबीसींसाठी लढणार असल्याचं त्यांनीच तिथं सांगितलं. मराठ्यांनी तुम्हाला सत्तेत आणले आणि तुम्ही ओबीसींसाठी लढणार, मग मराठा समाजासाठी कोण लढणार? दलित-मुस्लिम समुदायाने तुम्हाला मतदान केले नाही का? असा सवाल जरांगे यांनी केला.
फडणवीस म्हणजे पोलिस आणि पोलिस म्हणजे फडणवीस, हे समीकरण राज्यात आहे. तुम्ही काय मागच्या सारखे हल्ले घडून आणणार का? एका पोराला जरी धक्का लागल तर संपूर्ण राज्य बंद करून टाकेन, असा इशारा जरांगेंनी दिला. तसेच आता माघार नाही, आरक्षण घेऊ आणि ओबीसीतूनच घेऊ, असा निर्धारही जरांगे यांनी व्यक्त केला.