बॉलिवूड अभिनेत्री आणि समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन (jaya Bacchan) त्यांच्या तडक-भडक स्वभावामुळे पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ताज्या व्हिडीओमध्ये त्या एका व्यक्तीला रागाच्या भरात धक्का देताना दिसतात. घटना अशी की, जया बच्चन एका व्यक्तीसोबत उभ्या राहून बोलत असताना दुसरा व्यक्ती सेल्फी घेण्यासाठी पुढे येतो. हे पाहताच त्या संतापून त्याला धक्का देतात आणि ओरडतात.
जया बच्चन यांच्या अशा वागण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधीही पापाराझींवर आणि चाहत्यांवर त्यांचा राग ओसंडून वाहिल्याचे अनेकदा दिसले आहे. जून महिन्यात दिग्दर्शक रोनो मुखर्जी (Rono Mukherji) यांच्या प्रार्थनासभेतही त्यांनी पापाराझींना “बकवास” आणि “घाणेरडे” अशा शब्दांत सुनावले होते.
या ताज्या व्हिडीओवर भाजप खासदार व अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranuat) यांनी इन्स्टाग्रामवर जोरदार प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने जया बच्चन यांना “सर्वाधिक बिघडलेली आणि हक्क गाजवणारी महिला” म्हणत त्यांची तुलना कोंबडीशी केली. ही पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नेटकरीही जया बच्चन यांच्यावर टीका करत आहेत. अनेकांनी “अमिताभजी त्यांना कसे सहन करतात?” असा सवाल उपस्थित केला आहे.