तुळजापुरातील तुळजा भवानी मंदिरात राजकीय वाद (Tuljapur News) दिसून आला. तुळजा भवानी मंदिरात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि मंदिरातील सुरक्षारक्षकांत धक्काबुक्की झाली. या मंदिराच्या जीर्णोद्धारात मंदिराचे शिखर उतरवण्यास आमदार आव्हाड यांचा विरोध आहे. यानंतर आव्हाड थेट तुळजापुरात आले त्यांनी मंदिराला भेट देत पाहणी केली. याचवेळी हा प्रकार घडल्याची माहिती आहे. दरम्यान, यानंतर भाजप आक्रमक झाला. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत रास्ता रोको केला. आव्हाडांची गाडी रोखून धरण्याचा प्रयत्न केला.
याआधी आमदार आव्हाड यांनी आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. जीर्णोद्धाराच्या कामात मंदिराचे शिखर उतरवण्याला आव्हाड यांचा विरोध आहे. याचसाठी त्यांनी काल थेट तुळजापूर गाठले. देवीचे दर्शन घेतले आणि आपली भूमिका स्पष्ट केली. आव्हाड येथे आल्याचे समजताच भाजप कार्यकर्ते कमालीचे आक्रमक झाले.
त्यांनी आव्हाड यांच्या वक्तव्यांचा तीव्र निषेध केला. मुंब्र्याच्या आमदाराने येथे येण्याचं काय कारण? असा सवाल संतप्त भाजप कार्यकर्त्यांनी विचारला. येथेच रास्ता रोको केला. आव्हाड यांची गाडी पुढे जाऊ देणार नाही असा इशारा दिला. त्यामुळे येथे मोठा तणाव निर्माण झाला होता. मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मंदिरातील पुजाऱ्यांनीही आव्हाड यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला.
दरम्यान, आव्हाड यांनी मंदिरात येत पाहणी केली. याचवेळी मंदिराचे सुरक्षारक्षक आणि आव्हाड समर्थकांत वाद झाले. आव्हाड यांना मंदिरात सोडलेल्या ठिकाणीच आम्हालाही आत सोडा असे म्हणत कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यासाठी गर्दीी केली होती. याच वेळी सुरक्षारक्षक आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांत शाब्दिक वादही झाले. आव्हाड ज्यावेळी मंदिरात पाहणी करत होते त्यावेळी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना थांबवण्यात आले होते. या वादात भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. त्यांना बराच वेळ दर्शनाच्या रांगेत थांबून राहावे लागले.
Jitendra Awhad आव्हाडांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या
दुसरीकडे भाजप कार्यकर्तेही येथे दाखल झाले. त्यांच्यात आणि आव्हाड समर्थकांत धक्काबुक्की झाली. त्यामुळे मंदिराच्या परिसरात प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. तणावाचे वातावरण होते. भाजप कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या गाडीसमोरच ठिय्या मांडला. आव्हाड यांनी हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत आम्ही त्यांना येथून जाऊ देणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली होती. जितेंद्र आव्हाड यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. आव्हाड यांनी तुळजाभवानी मंदिराचा कळस काढण्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले असे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे होते.