शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिवाजी पार्कवर आयोजित सरकारविरोधी रॅलीत राज्यातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करताना सावली बार प्रकरणाचा उल्लेख केला. यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी दस्तऐवज दाखवत ठाकरेंना प्रत्युत्तर दिले.
कदमांनी सांगितले की, सावली बार संदर्भातील एग्रीमेंटची प्रत त्यांच्या जवळ आहे. यात कलम सहा व सात स्पष्टपणे नमूद करतात की, कोणताही बेकायदेशीर व्यवसाय त्या जागेत चालवला जाणार नाही आणि ठरवलेल्या नियमांनुसारच हॉटेल व्यवसाय होईल. त्यांनी पुढे स्पष्ट केले की, हे हॉटेल गेली 30 वर्षे अस्तित्वात आहे आणि योगेश कदम (Yogesh Kadam) नुकतेच राज्यमंत्री झाले आहेत. शेट्टी नावाच्या व्यक्तीस हॉटेल चालवण्याची परवानगी दिली होती; मात्र पोलिसांकडून नियमभंगाची माहिती मिळाल्यानंतर 12 जून रोजी ऑर्केस्ट्रा आणि बारची दोन्ही परवाने रद्द करण्यात आले आणि संबंधितांना बाहेर काढण्यात आले.
उद्धव ठाकरेंवर वैयक्तिक टीका करत कदम म्हणाले, “उद्धवजी, आधी स्वतःच आत्मपरीक्षण करा. तुम्हाला एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे. बाळासाहेबांच्या निधनानंतर तुम्ही माझ्यावर अन्याय केला. माझं मंत्रीपद आपल्या मुलाला दिलं आणि आमदारकीही हिरावून घेतली. पण कितीही प्रयत्न केले तरी माझा केसही वाकवू शकणार नाही. थोडे दिवस थांबा, माझ्याकडे भरपूर ‘मसाला’ आहे, जो लवकरच उघड करणार आहे.”