रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद गेल्या काही महिन्यांपासून चांगलाच चिघळला असून, अदिती तटकरे (Aditi Tatkare) (राष्ट्रवादी) आणि भरत गोगावले (Bharat Gogavle) (शिवसेना) यांच्यातील संघर्ष अजूनही कायम आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहणासाठी अधिकाऱ्यांची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार, यावर्षी रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान अदिती तटकरे यांना मिळाला आहे.
सध्या दिल्लीत असलेले रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, झेंडावंदनाचा मान मिळाल्याने कोणी पालकमंत्री ठरत नाही. पालकमंत्रिपद आणि ध्वजारोहण हे दोन वेगळे विषय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “वरिष्ठांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य आहे, पण रायगडाचा पालकमंत्री व्हावं ही माझी इच्छा अजूनही कायम आहे,” असे ते म्हणाले.
तसेच, एकनाथ शिंदे यांचा निर्णय अंतिम असेल आणि त्याबाबत ते पूर्ण विश्वासात आहेत, असेही गोगावले यांनी सांगितले. सुनील तटकरे आणि मुख्यमंत्री शिंदे यांची झालेली भेट राज्यकारभाराच्या चर्चेसाठी असावी, मात्र त्याचा तपशील त्यांनी विचारलेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले. शेवटी, “माझी पालकमंत्री होण्याची इच्छा नक्की पूर्ण होईल,” असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला.