बटाटा (Potato) हा आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात जास्त वापरला जाणारा घटक आहे. भाजीपासून स्नॅक्सपर्यंत, तो अनेकांच्या आवडीचा असतो. मात्र, आरोग्य प्रशिक्षक मनकीरत कौर यांच्या मते, बटाट्याचा काही विशिष्ट प्रकार जीवासाठी धोकादायक ठरू शकतो.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले की, हिरवट रंगाचे डाग पडलेले बटाटे किंवा अंकुर फुटलेले बटाटे अजिबात खाऊ नयेत. अशा बटाट्यांमध्ये सोलॅनिन नावाचे विषारी रसायन तयार होते, जे प्रकाशात जास्त वेळ राहिल्याने किंवा जास्त दिवस साठवणुकीत ठेवल्याने वाढते. हे रसायन उलट्या, मळमळ, पोटदुखी, डोकेदुखी, हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता आणि गंभीर परिस्थितीत मृत्यूलाही कारणीभूत ठरू शकते.
डॉ. अदितिज धमीजा यांनी दिलेल्या उदाहरणानुसार, 27 वर्षीय तरुणाला हिरवे अंकुरलेले बटाटे खाल्ल्यानंतर रक्तदाब धोकादायक पातळीवर घसरला व त्याला आयसीयूमध्ये दाखल करावे लागले.
सुरक्षित साठवणीचे उपाय:
बटाटे थंड, कोरड्या आणि अंधाऱ्या जागेत ठेवा.
प्रकाशात ठेवणे टाळा.
फ्रीजमध्ये ठेवू नका.
कांद्यांसोबत साठवू नका.
वेळोवेळी तपासणी करून कुजलेले किंवा अंकुरलेले बटाटे वेगळे करा.