आशिया कप (Asia Cup) 2025 साठी टीम इंडियाची अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली, तरी निवड समितीने स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला (Bumrah) संघात ठेवण्याचा मनोदय दाखवला आहे. इंग्लंड दौऱ्यात वर्कलोड मॅनेजमेंटवरून वादात सापडलेल्या बुमराहबद्दल सुरुवातीला आशंका होती की त्याला या स्पर्धेतून विश्रांती दिली जाईल. मात्र, पीटीआयच्या अहवालानुसार परिस्थिती उलट आहे. बुमराह या वेळच्या स्पर्धेत खेळणार असल्याची शक्यता जास्त आहे.
यंदाचा आशिया कप 9 ते 28 सप्टेंबरदरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणार असून, तो पूर्णपणे टी20 स्वरूपात खेळवला जाणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या टी20 विश्वचषकाच्या तयारीसाठी हा स्पर्धा महत्त्वाची मानली जात आहे. मागील आशिया कपचे जेतेपद राखण्यासाठी टीम इंडियाला बुमराहसारख्या अनुभवी खेळाडूची गरज भासणार आहे. तसेच स्पर्धा सुरू होण्यापूर्वी त्याला सुमारे दीड महिन्याची विश्रांती मिळालेली असेल.
याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत बुमराहला विश्रांती देण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तो आशिया कपसाठी ताजातवाना राहील. अंतिम निर्णय 19 ऑगस्टपर्यंत होण्याची अपेक्षा आहे, परंतु कर्णधार सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या आणि इतर खेळाडूंचे फिटनेस रिपोर्ट मिळणे महत्त्वाचे ठरणार आहे.