अभिनेता आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत, पण यावेळी कारण त्यांचा भाऊ फैजल खानचे (Faisal Khan) गंभीर आरोप. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत फैजलने दावा केला की, आमिरने त्याला जवळपास वर्षभर खोलीत बंद ठेवलं, चुकीची औषधे दिली आणि त्याच्यावर मानसिक दबाव आणला. या वक्तव्यांमुळे प्रकरण चांगलेच गाजत असताना, आता आमिर खानच्या कुटुंबाने अधिकृत निवेदन जारी करून आपली बाजू स्पष्ट केली आहे.
कुटुंबाने सोशल मीडियावर लिहिलं की, फैजलचे आरोप निराधार आहेत आणि ही पहिली वेळ नाही की त्याने अशा प्रकारे गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडल्या आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, फैजलशी संबंधित प्रत्येक निर्णय कुटुंबाने अनेक डॉक्टरांचा सल्ला घेऊन, त्याच्या हितासाठी आणि प्रेमाने घेतला आहे. त्यामुळेच हे खाजगी प्रकरण सार्वजनिक चर्चेत आणणं त्यांनी टाळलं होतं.
पोस्टमध्ये पुढे म्हटलं आहे, “आम्हाला फैजलने आई, बहीण आणि आमिर यांच्याबद्दल केलेल्या अपमानास्पद विधानांमुळे दुःख झालं आहे. माध्यमांनी कृपया सहानुभूती दाखवावी आणि या वैयक्तिक गोष्टींना अफवा किंवा वादात रूपांतरित करू नये.”
दरम्यान, फैजलच्या मते, त्यावेळी कुटुंबाला वाटत होतं की तो मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे, म्हणून त्याला बाहेरील संपर्कापासून दूर ठेवण्यात आलं. मात्र, तपासणीनंतर त्याला मानसिकदृष्ट्या स्थिर असल्याचं प्रमाणित करण्यात आलं.