शिर्डी मतदारसंघांमध्ये मतदार नोंदणीचा घोटाळा सुरू आहे. याबाबत आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रारी देखील केलेली आहे. शिर्डी मतदारसंघांमध्ये अनेक बोगस मतदार वाढवले जात आहेत हे प्रकार थांबवले गेले पाहिजेत मात्र यावरती कोणतीच कारवाई होत नाही असा खळबळजनक आरोप काँग्रेस पक्षाचे माजी आमदार तथा माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आयोगाच्या कार्यप्रणालीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
थोरात पुढे म्हणाले, निवडणूक आयोगाने जाणीवपूर्वक भारतीय जनता पक्षाला या प्रकारे मदतच केली आहे. या गोष्टीचा खऱ्या अर्थाने लोकशाहीला धोका आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात झालेल्या मतदानाबाबत देखील आम्ही जी माहिती मागवली होती ती आम्हाला देण्यात आली नाही. ईव्हीएमसह आमच्या मनात अनेक शंका आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
Balasaheb Thorat पोराबाळांवर बोलायला लावू नका, सुजय विखेंना टोला
संगमनेर मतदारसंघातील विकासकामांच्या मुद्द्यावरून माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरातांवर निशाणा (Balasaheb Thorat) साधला. यावर बोलताना थोरात म्हणाले की मी राधाकृष्ण विखेंवर (Radhakrishna Vikhe) बोलू शकतो. बोलताना हे वयाचा मान नसतील राखत पण मला मात्र पोराबाळांवर चर्चा करायला नका लावू, अशा शब्दांत माजी मंत्री थोरात यांनी सुजय विखेंना टोला लगावला.
निळवंडेचे काम व भोजापुरी चारीच्या कामावरून सत्ताधाऱ्यांकडून थोरातांवर टीका केली जात आहे. यावरत बोलताना थोरात म्हणाले की निळवंडेचे काम कोणी केले व भोजापूर चारीचे काम कोणी केले हे जनतेला माहिती आहे ते काही आंधळे नाहीत. मे-जून महिन्यामध्ये पाणी आलं हे काही ह्यांचे कर्तुत्व नाही. दोन्ही कामे आम्हीच केलेले आहेत असे थोरात यांनी स्पष्ट केले.
Balasaheb Thorat फडणवीसांचं उत्तर अत्यंच चुकीचं
राहुल गांधी यांनी जो बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर देताना राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) डोक्याची चीप चोरीला गेली असा टोला लगावला होता. याबाबत विचारले असता, मुख्यमंत्र्यांनी दिलेले उत्तर अत्यंत चुकीचे आहे. कारण राहुल गांधींनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर निवडणूक आयोगाने (Election Commission) द्यावे लागणार आहे.
भाजप अस्वस्थ झाला आहे कारण त्यांची चोरी उघडकीस येऊ लागली आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी असे वक्तव्य करणं योग्य नाही. बोगस मतदानाच्या विषयावर बोलताना पुढे थोरात म्हणाले की ढीगभर कागदांचे रेकॉर्ड पाठवण्यापेक्षा डायरेक्ट सीसीटीव्हीचे रेकॉर्ड पाठवले असते तर एकच मतदार चार ठिकाणी कशाप्रकारे मतदान करू शकतो हे सिद्ध करता आले असते.