‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (TMKOC) हा टीव्हीवरील सर्वात लांब चालणारा आणि लोकप्रिय कॉमेडी शो (Comedy Show) म्हणून ओळखला जातो. गोकुळधाम सोसायटीतील व्यक्तिरेखा आणि त्यांचं हास्यविनोदाने भरलेलं आयुष्य प्रेक्षकांना गेली १६ वर्षे मंत्रमुग्ध करत आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, ही गोकुळधाम सोसायटी प्रत्यक्षात अस्तित्वात आहे का?
या शोमध्ये रोशन सोढीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री जेनिफर मिस्त्री (Jennifer Mistry) बेनिवाल यांनी एका मुलाखतीत याबाबत खूपच रंजक माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, गोकुळधाम सोसायटी (Gokuldham society) म्हणजे खरं तर एक भव्य सेट आहे, आणि त्यात खरं तर कुठलीही खोली किंवा वास्तव घर नाही.
त्यांच्या म्हणण्यानुसार, गोकुळधामचे दोन स्वतंत्र सेट आहेत – एक बाह्य भाग, जो आपल्याला टीव्हीवर सोसायटीसारखा दिसतो, आणि दुसरा घरांच्या आतल्या दृश्यांसाठी वेगळा सेट. बाहेरचा भाग लाकडाचा बनलेला असून तो फक्त दिसायला सोसायटीसारखा आहे. आतमधील सीन हे पूर्णपणे वेगळ्या स्टुडिओमध्ये शूट होतात.
मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे, मुंबईच्या गोरेगाव फिल्मसिटीमध्ये हा सेट उभारण्यात आला आहे. पण घरांच्या आतल्या दृश्यांसाठी पूर्वी कांदिवली येथील स्टुडिओमध्ये शूटिंग केलं जात होतं, जे आता दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे. म्हणजेच, गोकुळधामवासीयांची आपण जी घरे टीव्हीवर पाहतो, ती एकत्र नसून वेगवेगळ्या ठिकाणी अस्तित्वात आहेत.
‘तारक मेहता’चा सेट म्हणजे केवळ मनोरंजनाचं केंद्र नसून, टीव्ही जगतातील एक कल्पनारम्य जग आहे, जिथे प्रत्येक पात्राच्या हसण्यामागे एक सुसज्ज प्लॅनिंग असतं.