टीम इंडियाने (Team India) इंग्लंडला (England) त्यांच्या घरच्या मैदानावर कसोटी मालिका जिंकण्यापासून रोखलं. अंतिम आणि पाचव्या कसोटीत भारताने अवघ्या 6 धावांनी बाजी मारत ही मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. इंग्लंडसाठी ही हार लाजिरवाणीच ठरली, कारण आता त्यांच्या पुढील मोठ्या लढाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिष्ठेच्या ॲशेस मालिकेकडे, जिची सुरुवात नोव्हेंबरपासून होणार आहे.
या मालिकेत इंग्लंडचा सामना होणार आहे त्यांच्या पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाशी. पाच कसोटी सामन्यांची ही मालिका सर्व क्रिकेट चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असते. पहिला सामना 21 नोव्हेंबरला पर्थमध्ये रंगणार आहे. पण मालिकेला अद्याप वेळ असतानाच, ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने इंग्लंडबाबत खळबळजनक भाकीत केलं आहे.
मॅकग्रा (McGrath) म्हणाला, “ऑस्ट्रेलिया (Austarlia) ही मालिका 5-0 ने एकतर्फी जिंकेल. माझ्यासाठी अशा भविष्यवाणी करणं सहज नाही, पण मला पॅट कमिन्स (Pat Cummins), हेझलवूड (Hazelwood), मिशेल स्टार्क (Mitchell Starc) आणि नॅथन लायनवर पूर्ण विश्वास आहे. हे चौघं घरच्या मैदानावर इंग्लंडसाठी अत्यंत घातक ठरतील. इंग्लंडचा ट्रॅक रेकॉर्डसुद्धा चांगला नाही.”
त्याने असंही सांगितलं की इंग्लंडला शेवटचं ॲशेसचं यश 2015 साली त्यांच्या घरच्या मैदानावर मिळालं होतं. त्यानंतर आजतागायत इंग्लंडला ही मालिका जिंकता आलेली नाही.
मॅकग्राने इंग्लंडचा प्रमुख फलंदाज जो रुटबाबतही मत मांडलं. त्यानुसार, “ऑस्ट्रेलियात रुटचं यापूर्वी विशेष योगदान नव्हतं. त्याचं एकही शतक ऑस्ट्रेलियात नाही. त्यामुळे यंदाची मालिका त्याच्यासाठी अत्यंत निर्णायक ठरेल.”
हॅरी ब्रूकच्या खेळाचं कौतुक करत मॅकग्रा म्हणतो, “ब्रूकचं बॅटिंग मला खूप आवडतं. पण ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी त्याला लवकर परत पाठवलं पाहिजे. इंग्लंडची सलामी जोडी डकेट आणि क्रॉली वेगात धावा करते, त्यामुळे सुरुवातीपासूनच आक्रमण होईल.”
ॲशेस 2025 वेळापत्रक:
पहिला सामना: 21-25 नोव्हेंबर, पर्थ
दूसरा सामना: 4-8 डिसेंबर, गाबा
तिसरा सामना: 17-21 डिसेंबर, अॅडलेड
चौथा सामना: 26-30 डिसेंबर, मेलबर्न
पाचवा सामना: 4-8 जानेवारी, सिडनी