मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगावकर (Sachin Pilgaonkar) हे आपल्या अभिनयासोबतच वैयक्तिक आयुष्यातील आठवणी, अनुभव शेअर करत असतात. त्यांच्या पत्नी सुप्रिया पिळगावकर आणि कन्या श्रिया पिळगावकर (Shriya pilgaonkar) यांच्यासह त्यांचं कुटुंबही चाहत्यांना चांगलंच परिचित आहे. मात्र सचिन यांच्या आयुष्यातील एक गोष्ट अनेकांना माहिती नाही. श्रियाच्या जन्माआधी त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली होती.
श्रिया ही त्यांची सख्खी मुलगी असून तिच्याबद्दल अनेक वर्षं एक गैरसमज पसरला होता की ती दत्तक आहे. पण यामागचं खरं सत्य त्यांनी स्वतः उघड केलं आहे. त्यांनी दत्तक घेतलेली मुलगी म्हणजे करिष्मा मखनी, जिला ते प्रेमाने “किट्टू” म्हणायचे.
करिष्मा (Karsihma) ही एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी होती. लहानपणी तिची आई आजारी होती आणि तिचे वडील, जे सचिन यांचे चांगले मित्र होते, तिला रेस्टॉरंटमध्येच वाढवत होते. एकेदिवशी सुप्रिया आणि सचिनने तिची परिस्थिती पाहिली आणि तिला आपल्या घरी आणण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ती अवघी ३-४ वर्षांची होती.
कायदेशीर दत्तक नसलं तरीही, सचिन-सुप्रिया यांनी तिला आपल्या लेकीप्रमाणे प्रेम दिलं, सांभाळ केला. अगदी अभिनयाच्या संधीसुद्धा दिल्या. त्यांनी तिच्या वडिलांसह ‘किट्टू फिल्म्स’ नावाची कंपनीही स्थापन केली. पण नंतर काही गैरसमज निर्माण झाले आणि करिष्माचे वडील तिला लंडनला परत घेऊन गेले — त्यासाठी त्यांनी कोणतीही कल्पना दिली नव्हती. यामुळे सचिन यांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी किडनॅपिंगचा आरोपही केला होता, जो नंतर फेटाळण्यात आला.
काही वर्षांनी करिष्मा परत मुंबईत आली आणि पुन्हा अभिनयाची संधी मागू लागली. सचिन आणि सुप्रिया यांनी तिचं पुन्हा स्वागत केलं, ती त्यांच्या घरी ६-७ महिने राहिली. पण तिचं वर्तन बिथरलं ती अभिनयाचे क्लासेस टाळू लागली, सल्ले ऐकत नव्हती. त्यामुळे इंडस्ट्रीत तिचं करिअर आकार घेऊ शकलं नाही. ती पुन्हा लंडनला गेली आणि काही काळाने आपल्या वडिलांसोबत पत्रकार परिषद घेऊन सचिन आणि सुप्रिया यांच्यावर गंभीर आरोप केले.
या सर्व प्रकरणामुळे एक गैरसमज पसरला की श्रिया (Shriya) हीच दत्तक लेक आहे, जो आजही काही लोकांच्या मनात आहे. पण खरं हेच की, श्रिया ही सचिन आणि सुप्रिया यांची जन्माने सख्खी मुलगी आहे.