दारू पिणाऱ्यांच्या गप्पांमध्ये “एक पेग बनव” हा संवाद अगदी सामान्य आहे. पण कधी विचार केला आहे का, हा “पेग” नेमका असतो तरी काय, आणि तो 30, 60 किंवा 90 मिलीचाच का असतो?
सुरुवात करूया सोप्या गणितापासून – बहुतांश दारूच्या बाटल्या 750ml या प्रमाणात येतात. अशा वेळी बारमध्ये बाटलीतील दारूचं मोजमाप करणं सोपं जावं म्हणून 30ml (स्मॉल), 60ml (लार्ज) यांसारखी प्रमाणं वापरली जातात. यामुळे बारटेंडर किंवा विक्रेता सहज हिशोब ठेवू शकतो की किती पेग सर्व्ह केले.
30ml पेग – हा प्रमाणात सौम्य आणि शरीराला तुलनेनं कमी त्रासदायक असतो. ज्यांना हलकं ड्रिंक करायचं असतं, त्यांच्यासाठी योग्य.
60ml पेग – सामान्यतः याला ‘स्टँडर्ड’ पेग मानलं जातं.
90ml पेग – ज्याला ‘पटियाला पेग’ असं म्हटलं जातं, तो जरा भारी ड्रिंक करणाऱ्यांसाठी असतो. नावावरूनच कळतं – पंजाबच्या पटियालामध्ये हे माप प्रचलित झालं आणि आज ते एक प्रसिद्ध संज्ञा बनलं आहे.
पण “पेग” हा शब्द कुठून आला?
असं मानलं जातं की ब्रिटनमधील खाणीमध्ये काम करणाऱ्या मजुरांना संध्याकाळी जे Precious Evening Glass (म्हणजेच “मूल्यवान संध्याकाळचं प्यायला”) दिलं जायचं, त्यावरून ‘PEG’ हा शब्द तयार झाला असावा. ब्रिटिशांच्या माध्यमातूनच हा शब्द भारतामध्ये आला आणि आज भारतात दारूचं मोजमाप ‘पेग’ने केलं जातं – आणि भारतासोबत केवळ नेपाळमध्येही ही संज्ञा प्रचलित आहे.
इतर देशांचं काय?
अमेरिका, युरोपसारख्या देशांमध्ये “पेग” नाही, तर ‘शॉट’, ‘सिंगल’, ‘डबल’ अशा पद्धतीने मोजमाप केलं जातं.
सिंगल = सुमारे 44ml
डबल = सुमारे 88ml