प्रत्येक धर्मात काही विशिष्ट नियम आणि परंपरा असतात, त्याचप्रमाणे इस्लाम (Isalam) धर्मातही काही धार्मिक चिन्हं आणि जीवनशैली मानली जाते. मुस्लिम पुरुष दाढी ठेवतात हे आपण नेहमीच पाहतो, पण यामागे फक्त फॅशन किंवा सौंदर्यदृष्टीकोन नाही, तर एक धार्मिक श्रद्धा आणि प्रथा आहे.
इस्लाममध्ये दाढी ठेवणं हे धार्मिकतेचं प्रतीक मानलं जातं. अनेक मुस्लिम पुरुष मग ते सामान्य असोत की धर्मगुरू दाढी ठेवतात आणि यामध्ये धर्माचं पालन आहे असं मानलं जातं. शरियतनुसार, दाढी ठेवणं ही एक आदर्श सुन्नत आहे, जी इस्लामच्या शेवटच्या पैगंबर हजरत मुहम्मद (स.) यांनी स्वतः आचरणात आणली होती.
दाढी ठेवण्याची धार्मिक मुळे
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितलं आहे की, “मिशा लहान ठेवा आणि दाढी वाढवा.” त्यामुळे, दाढी ठेवणं ही एक धार्मिक परंपरा ठरते. त्यांच्या अनुयायांनी आणि साथीदारांनीही ही प्रथा पाळली आहे.
दाढी किती लांब असावी?
इस्लामिक हदीसनुसार, दाढी किमान एवढी असावी की ती एका मुठीत बसेल. जर ती यापेक्षा जास्त लांब झाली, तर थोडी ट्रिम करणं ठीक मानलं जातं. पण एका मुठीपेक्षा लहान दाढी ठेवणं हे सुन्नतच्या विरुद्ध मानलं जातं.
दाढी वाढवण्याचं वय
दाढी वाढवण्यासाठी ठराविक वय नाही. मात्र, जेव्हा मुलगा प्रौढ होतो, तेव्हा त्याने दाढी वाढवणं सुरू करणं आवश्यक मानलं जातं. शरियतच्या दृष्टीने, त्यावेळी धार्मिक जबाबदाऱ्या लागू होतात.
दाढी रंगवण्याचे नियम
इस्लाममध्ये जर एखाद्याची दाढी पांढरी झाली असेल, तर लाल रंग किंवा मेंदी लावण्यास हरकत नाही. पण वयस्क मुस्लिमांनी काळा रंग टाळावा, तो शरियतच्या विरोधात मानला जातो. मात्र, तरुणांनी काळा रंग लावणं योग्य ठरू शकतं.
मिशांबाबत काय नियम आहेत?
मिशा ठेवण्यावर इस्लाममध्ये बंदी नाही. पण त्या स्वच्छ आणि लहान असाव्यात. इतकं लहान की पाणी पिताना मिशा ग्लासात जाऊ नयेत. म्हणजेच, सौम्य आणि स्वच्छता राखणाऱ्या मिशा परवानगीच्या कक्षेत येतात.
दाढी ही केवळ एक सौंदर्याचा भाग नाही, तर इस्लाम धर्मातील एक श्रद्धा आणि सुन्नत आहे. त्यामागील नियम, श्रद्धा आणि पारंपरिक विचारधारा यामुळे ती मुस्लिम पुरुषांच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग ठरते.