केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारला नितीमत्ता राहिलेली नाही. पाकिस्तान आपला दुष्मन आहे. पाकिस्तान जोपर्यंत दहशतवाद थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवायला नको. आपल्या माता-भगिनींचा सिंदूर पुसणाऱ्या पाकिस्तानसोबत आपण क्रिकेट कसे खेळू शकतो, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. ‘सच्चा देशभक्त’ यांनी पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळू नयेत, असे टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळायला नको, असे भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी देखील म्हटले होते, याचीही आठवण उद्धव ठाकरे यांनी दिल्ली दौऱ्यावेळी भाजपला करुन दिली आहे.
Uddhav Thackeray देशात अघोषित एनआरसी लागू झाले आहे का?
स्वतःची ओळख मतदारांनी पटवून द्यायची आहे, निवडणूक आयोगाने असा निर्णय घेतला आहे. देशात अघोषित एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स) त्यामुळे लागू करण्यात आले आहे का, असा सवाल उद्ध ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ते लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांनी रात्रीच्या जेवणासाठी निमंत्रित केले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.
बिहारमध्ये विधानसभा निवडणूक आहे. तत्पूर्वी तिथे मतदार नोंदणी आणि मतदार तपासणीवरुन गोंधळ सुरु आहे, यावरुन उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला टोला लगावला आहे. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख म्हणाले की, बिहारमध्ये मतदार याद्याचा घोळ झाला, त्यावर अंतिम निर्णय काय आला ते माहित नाही. पण त्यामध्ये सर्वाधिक गोंधळ झाला तो मतदारांनी स्वतःची ओळख पटवून देण्याच्या मुद्यावर. जर मतदारांना त्यांची ओळख पटवून द्यायची असेल तर देशात अघोषित एनआरसी (नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स) लागू झाला आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
ते म्हणाले की, सीएए आणि एनआरसीचा मुद्दा दिल्लीमध्ये गाजला होता. दिल्लीमध्ये त्याविरोधात रान पेटलं होतं. अनेक ठिकाणी त्याविरोधात आंदोलने झाली होती. आसाममध्ये एनआरसीविरोधात आंदोलन झाले होते. त्यामध्ये भारतीय नागरिकांना ते भारतीय असल्याची ओळख पटवून द्यायची होती. आताही निवडणूक आयोगाने नागरिकांना तुम्हीच तुमची ओळख पटवून देण्यास सांगितले आहे. त्यामुळे देशात अघोषित एनआरसी लागू झाले आहे का? असा सवाल त्यांनी केला.
महाराष्ट्रात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक होणार आहे. त्यासंबंधीची माहिती राज्य निवडणूक आयोगाने नुकतीच दिली. त्यामध्ये व्हीव्हीपॅट मशीन या निवडणुकीत वापरले जाणार नसल्याचे म्हटले आहे, यावरुन उद्धव ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, निवडणूक आयोगान त्यांच्या निवडणूक कार्यक्रमात आणखी अपारदर्शक प्रक्रिया आणली आहे. मतदान केल्यानंतर दिसणारी स्पीप आता दिसणार नाही, त्यासाठीची व्हीव्हीपॅट मशीन त्यांनी काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एवढीच अपारदर्शक निवडणूक घ्यायची असेल तर त्यापेक्षा निवडणुकाच कशाला घेता, असा संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी केला. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर टीका करताना ते म्हणाले की, निवडणुकाच कशाला घेता. तुम्हाला वाटते त्यांच्या पक्षाचे एवढे उमेदवार जिंकले हे जाहीर करुन टाका.
Uddhav Thackeray ईव्हीएमवर उद्धव ठाकरेंना शंका
“मतदारांना त्यांनी दिलेले मत कुठे जात आहे हेच ईव्हीएम मशीनमुळे कळत नाही. बटण दाबलं जातं, दिवा लागतो, आवाज येतो, ती रिसीट दिसते, पण नंतर त्या सगळ्या रिसीट मोजल्या जात नाही. केलेले मतदान कुठे रजिस्टर झाले ते कळत नाही. बॅलेट पेपरवर केलेल्या मतदानामध्ये पारदर्शकता होती. मतदान कुठे केले हे शेवटपर्यंत कळत होते. मतदाराने ईव्हीएममध्ये केलेले मतदान गेले कुठे, असा प्रश्न निर्माण होतो,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.
ईव्हीएम मशीवर आधीच विरोधकांकडून शंका उपस्थित केली जात आहे. त्यात आता व्हीव्हीपॅट मशीन काढून घेतले जाणार आहे. त्यामुळे निवडणुका घेण्याचा फार्स कशाला करता? असा सवाल ठाकरेंनी केला आहे.
Uddhav Thackeray उपराष्ट्रपती कुठे आहेत, त्यांचा राजीनामा का झाला ?
उपराष्ट्रपतींना तडकाफडकी का काढले, आता ते कुठे आहेत, असे सवाल करत उपराष्ट्रपतींच्या राजीनाम्यावरुन उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारला घेरले. उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी संसदेचे अधिवेशन सुरु झाल्याबरोबर पदाचा राजीनामा दिला. धनकड यांच्या तडकाफडकी राजीनाम्यामुळे भाजप खासदारांसह सर्वांनाच धक्का बसला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना यावरुन उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. उपराष्ट्रपती सध्या कुठे आहेत, त्यांचा राजीनामा का झाला असे सवाल त्यांनी केले. ते सध्या कुठे आहेत, हेच माहीत नाही, ते जर भेटले तर त्यांनी राजीनामा का दिला असे त्यांना विचारणार असल्याचेही ठाकरे म्हणाले.