सध्या मराठी मनोरंजनविश्वात प्राजक्ता माळी (Prajakta mali) या नावाभोवती प्रचंड चर्चा आहे. ‘फुलवंती’ (Phulwanti) या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारी प्राजक्ता आज महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. यशाच्या शिखरावर पोहोचलेली ही अभिनेत्री, एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील संघर्षांची आणि भावना उघडपणे मांडताना दिसली.
प्राजक्ताने सांगितलं की टीनेजनंतरचा तिचा काळ अत्यंत खडतर होता. वयाच्या 17व्या वर्षी तिने ज्या प्रकारचे संकट अनुभवले, त्यातून ती खंबीरपणे बाहेर आली. “शांत राहिलं तर काही मिळत नाही, मी जगायला आलेय, काहीतरी जबरदस्त करूनच जाईन,” असं ठामपणे सांगत तिने तिच्या आतल्या उर्जेचा ठसा उमटवला.
प्रेमातही प्राजक्ताने अनेक धक्के खाल्ले. “डेंजर डेंजर ब्रेकअप्स झालेत,” असं स्पष्ट सांगत तिने आपल्या वैयक्तिक जीवनातील वेदना शेअर केल्या. पुणे ते मुंबई असा तिचा प्रवास आर्थिक, मानसिक आणि भावनिक संघर्षांनी भरलेला होता. घरच्यांचा मानसिक आधार होता, पण प्रत्यक्षात ती एकटी होती. अपमान, टोमणे, जातीभेद, गटबाजी या सगळ्याला सामोरे जात ती आपली ओळख निर्माण करत गेली.
‘रेशीमगाठ’ (Reshtimgath) मधील मेघनासारखी संयमी भूमिका आणि ‘नकटीच्या लग्न’मधील धडाडीची नकटी – या दोन्ही भूमिकांनी तिच्या व्यक्तिमत्त्वाला नवे वळण दिले. याच अनुभवांमुळे ती अधिक सशक्त झाली आणि आजचा तिचा आत्मविश्वास घडला.
तिच्या अध्यात्माच्या प्रवासाबद्दलही प्राजक्ताने भरभरून सांगितलं. अभिनयाचा सुरुवातीचा काळ, पहिली मालिका, चित्रपट – हे सारे टप्पे तिच्यासाठी शिकवण्या ठरल्या.
वर्कफ्रंटबाबत सांगायचं झालं, तर ‘फुलवंती’नंतर ती ‘चिकी चिकी बूबूम बूम’ या बहुचर्चित चित्रपटात दिसली. स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहेरे यांच्यासारख्या कलाकारांसोबत तिने भूमिका साकारली.