शुभमन गिलच्या (Shubhman Gill) नेतृत्वात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात 6 धावांनी जोरदार विजय मिळवला. यामुळे 5 सामन्यांची ही मालिका 2-2 अशा बरोबरीत संपली. या विजयासह भारतीय संघाचा दौरा संपुष्टात आला असून आता खेळाडू काही काळ विश्रांती मोडमध्ये असतील.
क्रिकेटप्रेमींना आता टीम इंडियाला (Team India) पुन्हा मैदानात पाहण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ऑगस्ट महिन्यात भारतीय संघाचा कोणताही सामना नियोजित नाही. याआधी बांगलादेश दौरा अपेक्षित होता, परंतु तो बीसीसीआयने पुढे ढकलला. श्रीलंका दौऱ्याबाबतही अनिश्चितता आहे. त्यामुळे भारताचा पुढचा ॲक्शन मोड थेट सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.
टीम इंडिया आता थेट आशिया कप (Asia Cup) 2025 स्पर्धेत सहभागी होणार आहे. 9 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेत भारत आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळणार आहे. यानंतर 14 सप्टेंबरला पाकिस्तान आणि 19 सप्टेंबरला ओमानविरुद्ध सामना होईल. त्यानंतर सुपर 4 टप्प्यातील सामन्यांची सुरुवात होईल. सुपर 4 मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा भिडतील, अशी शक्यता आहे. मात्र, या सामन्यावर काही राजकीय अनिश्चिततेचं सावट आहे. सप्टेंबरमध्ये आशिया कपमधून टीम इंडिया पुन्हा मैदानात उतरल्यावर क्रिकेटप्रेमींना पुन्हा एकदा रोमांच अनुभवायला मिळणार आहे.
यंदा आशिया कपमध्ये एकूण 8 संघ सहभागी झाले असून त्यांना दोन गटांत विभागण्यात आलं आहे.
ग्रुप A: भारत, पाकिस्तान, यूएई, ओमान
ग्रुप B: श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, हाँगकाँग