तीन तरुणींना पोलीस ठाण्यात आणून पोलिसांनीच (Pune Police) त्यांचा मानसिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप पुण्याच्या कोथरूड पोलीस ठाण्यात होत आहे. राज्यभर या प्रकरणाची चर्चा सुरु असून सत्ताधाऱ्यांविरोधात आता विरोधक आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्रात महिला आणि मुली यामुळे सुरक्षित आहेत का? तसेच महिला पोलीस ठाण्यातही अत्याचार होत असतील तर कुठे सुरक्षित आहेत? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. अशामध्ये रविवारी (3 ऑगस्ट) ही घटना उघडकीस आल्यानंतर या प्रकरणी वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने रात्री 3 पर्यंत पुणे पोलीस आयुक्तालयात ठिय्या दिला होता. पण यावेळी पोलिसांकडून फक्त चार ओळींचे पत्र देत आम्ही गुन्हा दाखल करु शकत नाही असे सांगितले.
रात्री 3 पर्यंत संबधित पीडित तरुणी तसेच आमदार रोहित पवार यांच्यासह वंचितचे नेते सुजात आंबेडकर, अंजली आंबेडकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून होते. यावेळी सुमारे साडे 3 वाजता पोलिसांनी त्यांच्याकडे पत्र सोपवले, यामध्ये म्हंटले की, ज्याबाबत मुलींनी तक्रार दिली आहे, ती घटना एका रूममध्ये घडली आहे. पोलीस कर्मचाऱ्यांविरोधात सार्वजनिक ठिकाणी घडलेली नसल्यामुळे संबंधित कोणतेही पुरावे नाहीत. मुलींनी जी अॅट्रोसिटीची तक्रार दाखल केली आहे. त्यामध्ये कोणतेही तथ्य आढललेले नाही. याप्रकरणात त्यामुळे गुन्हा दाखल करता येणार नाही, असे पोलिसांनी पत्रात म्हटले आहे. रात्री 11 वाजेपर्यंत तुमच्या तक्रारीबाबत काय घडते? ते कळवू असे पोलिसांनी मुलींना सांगितले होते. पण त्यानंतरही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते पुणे पोलीस आयुक्तालयात ठाण मांडून बसले होते. अखेर रात्री साडे 3 वाजता आम्ही गुन्हा दाखल करू शकत नाही, असे सांगत पत्र दिले. त्यामुळे आता पोलिसांवर दबाव असल्याची चर्चा रंगली आहे.
Pune Police नेमकं काय प्रकरण आहे?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक 23 वर्षीय विवाहित तरुणी पती आणि सासरच्या छळाला कंटाळून पुण्यात मैत्रिणीकडे आली. तिने सामाजिक कार्यकर्त्या महिलांपुढे आपली कहानी सांगितली. तिचा शारीरिक आणि मानसिक छळ पती आणि सासरा करतात, मला परत त्यांच्याकडे जायचे नाही. मला मदत करा. या पतीपीडित महिलेला पुण्यात राज्य सरकारमार्फत चालवल्या जात असलेल्या ‘वन स्टॉप सखी सेंटर’ येथ दाखल करण्यात आले. तिला आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी मदत केल्याच्या आरोपात पुण्यातील तीन तरुणींना कोणतीही पूर्वसूचना न देता कोथरुड पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या घरात घुसून त्यांना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली. त्यांना शारीरिक आणि लैंगिक अपमानास्पद भाषा वापरण्यात आली, असा पीडित मुलींचा आरोप आहे.काही साध्या वेषातील पोलीस आणि संभाजीनगरहून आलेल्या महिलाचा सासरा देखील घरात घुसलेल्यांमध्ये होता, असा तिन्ही पीडितांचा आरोप आहे. पीडितांचा संभाजीनगर येथील पोलीस कर्मचारी अमोल कामटे आणि महिला पोलीस संजीवनी शिंदे यांनी मारहाण केल्याचाआरोप आहे. ऍट्रॉसिटी कायद्यानुसारयाप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.