पुण्यातील एमआयडीसी (Pune MIDC) परिसरात वाढत चाललेली गुन्हेगारी आणि राजकीय हस्तक्षेप यावरून आता राज्यात नवा वाद उफाळला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या ‘दादागिरी घुसली आहे’ या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) थेट फडणवीसांनाच (Devendra Fadanvis) प्रश्न विचारत टोला लगावला आहे. एमआयडीसीमध्ये दादांची (Ajit Pawar) दादागिरी आहे का? ती दादागिरी अजित पवारांची आहे की भाजपची, की शिंदे गटातील नेत्यांची? फडणवीसांनी उघडपणे नावं जाहीर करावीत, अशी मागणी करत रोहित पवारांनी महायुतीतील अंतर्गत कलगजीवर बोट ठेवलं आहे. या आरोप-प्रत्यारोपांमुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
Rohit Pawar ‘दादागिरी’वरून थेट फडणवीसांना सवाल
पुण्यातून अनेक कंपन्या स्थलांतरित होत आहेत. तळेगाव, चाकण परिसरातील कंपन्याही निघून जात आहेत. हे सगळं पाहून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, विकासाचा दर का खुंटतोय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जर व्यासपीठावर ‘दादागिरी’ असल्याचं म्हणत असतील, तर मग तुम्ही काय करत आहात? पुण्यात MIDC मध्ये नक्की कोणाची दादागिरी आहे? दादांच्या पक्षाची की भाजपाची? की एकनाथ शिंदे गटाची? हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे, असा थेट सवाल रोहित पवारांनी फडणवीसांना केला.
Rohit Pawar महायुतीमध्ये अंतर्गत कुरबुरी?
दादागिरी कोण करतं, हे जर फडणवीसांना माहिती असेल, तर त्यांनी नाव जाहीर करावी. असंही रोहित पवार म्हणाले. एकनाथ शिंदे कुठेही गेले, तरी हे स्पष्ट होतं की महायुतीत ‘ऑल इज वेल’ नाही. आता जनतेला यांचा त्रास होत आहे. विकासाचा वेग कमी झालाय, योजनांचा अंमल खुंटलाय, असा आरोपही त्यांनी केलाय. जर फडणवीसांना सगळं माहिती असूनही कंपन्या गुजरातला जात असतील, तर भाजपची भूमिका काय आहे हे पाहायला हवं. महाराष्ट्राचं नुकसान करणाऱ्या धोरणांना कोणी साथ देतंय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
Rohit Pawar कृषीमंत्र्यांच्या वक्तव्यावर फटकारा
दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यावर टीका करताना रोहित पवार म्हणाले, कृषीमंत्री म्हणतात वाकडं काम सरळ करावं लागतं, पण वाकडं काम करूनच तुम्ही महाराष्ट्राची तिजोरी वाकडी केली आहे. वाकडं काम करण्यासाठी तुम्हाला कृषी मंत्री पद दिलं नाही. मी सरळ काम करणाऱ्यांच्या पाठीशी आहे. वाकडं काम झालं, तर महाराष्ट्र माफ करणार नाही, आम्ही माफ करणार नाही. हे संपूर्ण भाष्य रोहित पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलं.