भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) याच्या वैयक्तिक आयुष्याने अलीकडे खूपच वळण घेतलं आहे. मार्च 2025 मध्ये त्याने पत्नी धनश्रीसोबत (Dhanshree) घटस्फोटाची अधिकृत घोषणा केली. याआधी अनेक महिन्यांपासून त्यांच्या नात्याबाबत चर्चांना आणि अफवांना जोर आला होता. घटस्फोटानंतर चहलने पहिल्यांदाच एका मुलाखतीत आपल्या खासगी आयुष्यावर खुलेपणाने भाष्य केलं आहे.
चहल म्हणाला की, “वाद बराच काळ सुरु होते, पण आम्ही ठरवलं होतं की अंतिम निर्णय होईपर्यंत काहीच सार्वजनिकपणे बोलायचं नाही.” दोघंही सोशल मीडियावर एकत्र असल्याचा आभास निर्माण करत राहिले. मात्र, आतून नातं तुटत चाललं होतं.
“सतत तडजोड करावी लागत होती, एकमेकांचे स्वभाव जुळत नव्हते. मी देशासाठी क्रिकेटमध्ये व्यस्त होतो आणि ती तिच्या कामात. नात्यासाठी वेळ उरत नव्हता. रोज वाटायचं आता पुरे झालं,” असंही त्याने सांगितलं.
चहलने कबूल केलं की या मानसिक तणावाने त्याला आत्महत्येच्या विचारापर्यंत आणलं होतं. “सुमारे ४०-४५ दिवस मी दिवसातून दोन तास रडायचो आणि दोन तास झोपायचो. आयुष्यावरच उदास झालो होतो. क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा वाटत होता,” अशा भावनिक शब्दांत त्याने आपलं दुःख व्यक्त केलं.
घटस्फोटानंतर लोकांनी त्याच्यावर आरोप केले, नावं जोडली, पण चहल म्हणतो, “माझ्या दोन बहिणी आहेत, आई-वडिलांनी स्त्रियांविषयी आदर शिकवला आहे. मी कोणासोबत दगाबाजी केली नाही.”
धनश्री आणि चहल यांनी डिसेंबर 2020 मध्ये लग्न केलं होतं, मात्र नातं फार काळ टिकलं नाही. अखेर 20 मार्च 2025 रोजी वांद्रे हायकोर्टाने त्यांच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब केलं.